चामोर्शीतील अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच
By admin | Published: June 25, 2016 01:25 AM2016-06-25T01:25:29+5:302016-06-25T01:25:29+5:30
आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे.
तहसीलदार व एसडीओ जबाबदार : माणिकराव तुरे यांचा आरोप
गडचिरोली : आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे. २०१५ पासून अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या अतिक्रमणाकडे चामोर्शीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिपाइं खोब्रागडे गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर जागा ही चामोर्शी शहरातील अतिशय महत्त्वाची व संवेदनशील जागा आहे. येथे अतिक्रमण होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होण्याचे कारण काय, असा सवाल तुरे यांनी केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली व क्रीडांगण, बसस्थानकासाठी चामोर्शीवासीयांना जागा उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी चामोर्शी शहरात होत असलेल्या अतिक्रमणाला उपविभागीय अधिकारी हे जबाबदार आहेत, असा सूर लावला. अतिक्रमणधारकातील एकाने न्यायालयात धाव घेऊन ही जमीन आपल्याला द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु शासनाने अटी व शर्तीमध्ये ते बसत नाही म्हणून त्यांचा अर्ज खारीज केला. सदर अतिक्रमणधारक हा कोट्यधीश असून यापूर्वीही त्याला शासनाने जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून लावला व त्याने अतिक्रमण केलेली जागा चामोर्शीच्या विकासासाठी मोकळी करून देण्यात यावी, असे आदेश तहसीलदार चामोर्शी यांना देण्यात आले.
२२ जून रोजी चामोर्शी येथे महसूल विभागाने समाधान शिबिर घेतले. त्यावेळी आपण या जागेबाबत प्रश्न उपस्थित केला व कोर्टाने आदेश दिलेले असल्याने चामोर्शीच्या तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या जागेवरील अतिक्रमण विनाविलंब हटवावे, अशी मागणी केली. असे तुरे यांनी म्हटले आहे. मात्र अजूनही तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या धनाड्याचे अतिक्रमण हटविलेले नाही, असे आरोप तुरे यांनी केला आहे.