सत्तेसाठी जातीच्या सीमारेषा पुसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:57 AM2018-11-24T00:57:55+5:302018-11-24T00:59:22+5:30
निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तशी राजकीय जागृती बहुजन समाजामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात शुक्रवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आंबेडकर उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या राज्य संघटिका रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माला भजगवडी, स्वागताध्यक्ष डॉ.खुशबू दुर्गे, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, संगीता मेश्राम, डॉ.धम्मसंगिनी, शहनाज पठाण, सुरेखा बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. आंबेडकर म्हणाल्या, बाबासाहेबांनी मोठ्या संघर्षाने बहुजन समाजाला हक्क प्राप्त करून दिले. मात्र दुसऱ्याला मतदान करून आपण स्वत:च्या हक्कांवर गदा आणत आहोत. जोपर्यंत बहुजन समाजातील सर्व जाती एकत्र येत नाही, तोपर्यंत बहुजन समाजाचा उमेदवार विजयी होणार नाही. आपला समाज स्वत:च्या अधिकारांविषयी जागृत झाला आहे. ही जागृती आदिवासींसह इतर समाजामध्येही निर्माण करणे आवश्यक आहे. येथील आदिवासींच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या, जेणेकरून आदिवासी समाजही आपल्यासोबत जोडण्यास मदत होईल. शासनाने सुमारे २९ बिलियन रूपये खर्च करून सरदार पटेल यांचा पुतळा उभारला आहे. पुतळे उभारण्यापेक्षा मनुष्यबळ विकासाची कामे होणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकार मात्र पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवत आहे. त्यामुळे जनता हैराण आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. कार्यक्रमादरम्यान रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट यांनीही मार्गदर्शन केले.
संचालन भाग्यश्री मेश्राम, प्रास्ताविक उज्ज्वला साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सपना रामटेके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ता बाळू टेंभूर्णे, विधानसभा अध्यक्ष जी.के.बारसिंगे, सिद्धार्थ भैसारे, मिलींद अंबादे यांनी सहकार्य केले. मेळाव्याला जवळपास दोन हजार महिला व पुरूष उपस्थित होते.