‘शिक्षणाच्या कार्यातून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:37+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गुरूवारी पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अविकसित, मागास अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. शिक्षकांनी शिक्षणाच्या पवित्र कार्यातून गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी शिक्षकवृंदांना केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गुरूवारी पार पडला. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्राथमिक विभागातून १० व माध्यमिक विभागातून दोन अशा १२ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार, पशुसंवर्धन सभापती कोदंडधारी नाकाडे, जि.प. सदस्य संपत आळे, वैशाली ताटपल्लीवार, सरीता तैनेनी, गीता कुमरे, लता पुंगाटी, रंजना कोडापे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १२ शिक्षकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यांना रोख पाच हजार रुपये, गणवेश, साडी-चोळी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांचे आस्थापनाविषयीचे सर्व प्रश्न व समस्या मार्गी लावणार, एकस्तर वेतनश्रेणी व इतर सेवाविषयक प्रश्न निकाली काढणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
योगीता भांडेकर यांनी शिक्षकांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून सर्वांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे अध्यापन करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविले पाहिजे, असे सांगितले. जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपण शिक्षकांच्या समस्येविषयी जागरूक आहो, शिक्षकांना सन्मान मिळाला पाहिजे. कोणत्याही अडीअडचणी आल्यास शिक्षकांनी बिनधास्तपणे त्या आपल्याकडे मांडाव्यात, असे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी मानले.
कार्यक्रमाला जि.प.च्या शिक्षण विभागाचे कर्मचारी, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबिय उपस्थित होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा हा शेवटचा कार्यक्रम होता.
या शिक्षकांचा पुरस्काराने सन्मान
निकेश योगीराज बन्सोड जि. प. शाळा पाथरगोटा, दिनदयाल रतीराम प्रधान जि. प. शाळा सावंगी, मारोती दोगे वाचामी जि. प. शाळा हेमलकसा, गौतम मनोहर लांडगे जि. प. शाळा चिचेवाडी, नामदेव भिकाजी चालुरकर जि. प. शाळा गुरूपल्ली, सूजय जगदीश बाच्छाड जि. प. शाळा गणेशनगर, सचिन रतीराम मेश्राम प्राथमिक शाळा बाम्हणी, नितीनकुमार हिरामण कुंभारे प्राथमिक शाळा खामतळा, शीला श्यामराव वारजूरकर जि. प. शाळा कुनघाडा माल, हेमराज तानुजी सुकारे जि. प. शाळा नांदळी आदी शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हे सर्व १० शिक्षक प्राथमिक विभागात कार्यरत आहेत.
माध्यमिक विभागातून जि. प. हायस्कूल चामोर्शीचे मुख्याध्यापक व्यंकटाचारी रामाचारी आरवेली व उच्च श्रेणी मुख्याध्यापक डकाराम तुकाराम कोहाळे जि. प. हायस्कूल धानोरा यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. धर्मपूर जि. प. शाळेचे शिक्षक वेणूगोपाल बाबुराव दासरवार व घोट येथील जि. प. महात्मा गांधी हायस्कूलचे शिक्षक शिवराम उष्टूजी मोंगरकर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या दोन शिक्षकांना गणवेश, साडीचोळी, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान भामरागड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवने व स्काऊट गाईड चळवळीत काम करणाऱ्या योग शिक्षिका सुधा सेता तसेच साधन व्यक्त चांगदेव सोरते यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. दुपारी बराच वेळ हा कार्यक्रम सुरू होता.