चामोर्शीच्या तलावातील श्रीमंतांचे अतिक्रमण हटवा
By admin | Published: March 25, 2017 02:26 AM2017-03-25T02:26:07+5:302017-03-25T02:26:07+5:30
चामोर्शी शहराच्या एसटी डेपोकरिता राखीव असलेल्या आष्टी-वागदरा मार्गावरील मामा तलावातील अतिक्रमण
माणिकराव तुरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली : चामोर्शी शहराच्या एसटी डेपोकरिता राखीव असलेल्या आष्टी-वागदरा मार्गावरील मामा तलावातील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (खोब्रागडे) जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
माणिकराव तुरे यांनी म्हटले आहे की, या तलावावर चामोर्शी शहरातील धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. राईस मिलकरिता अनेकांनी अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता व मच्छीमारांना अडचण निर्माण झाली आहे. या जागांवर पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. चामोर्शी येथील एसटी आगारासाठी जागा हवी आहे. मात्र ती उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे सरकारी जागेवर अतिक्रमण होत आहे. श्रीमंत लोकांचे हे अतिक्रमण असल्याने ते काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी सावरकर यांच्या काळात ३ लाख रूपये कार्यालयात भरणा करण्यात आले. आगाराला जागा उपलब्ध झाली नाही. आगार होणे गरजेचे असल्याने हे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे, असेही तुरे यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)