आरक्षण पूर्ववत करून अन्याय दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:19 AM2018-08-04T01:19:20+5:302018-08-04T01:20:29+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून कपात करीत ते ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव व बेरोजगार युवक, युवतींवर मोठा अन्याय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून कपात करीत ते ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव व बेरोजगार युवक, युवतींवर मोठा अन्याय होत आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात राकाँचे गडचिरोली तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी समाज संघटना, शिवसेना व त्यापाठोपाठ राकाँचा ओबीसी सेल आक्रमक झाला आहे. राकाँनेही आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
निवेदन देताना विवेक बाबनवाडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, कबीर शेख, हबीब खॉ पठाण, पुंडलिक खडसे, मुस्ताक शेख, अशोक बोहोरे, देवराव झोडणे, योगाजी हुलके, संतोष आवारी, अंकुश कोलते, जी.के.ठाकरे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात ओबीसींची संख्या लाखांच्या आसपास आहे. सुशिक्षित बेरोजगारांचीही या प्रवर्गात संख्या वाढली आहे. मात्र आरक्षण कपात केल्याने शासकीय नोकरीची दारे बंद झाली आहेत. भाजपच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.