वाहतूक निरीक्षकावरील अन्याय दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:25+5:302021-03-10T04:36:25+5:30
गडचिराेली : राज्य परिवहन महामंडळ विभाग गडचिराेली येथे कार्यरत कुवरलाल तिलगामे या सहायक वाहतूक निरीक्षकावर एसटीच्या विभाग नियंत्रकांनी खाेटे ...
गडचिराेली : राज्य परिवहन महामंडळ विभाग गडचिराेली येथे कार्यरत कुवरलाल तिलगामे या सहायक वाहतूक निरीक्षकावर एसटीच्या विभाग नियंत्रकांनी खाेटे आराेप लादून त्यांची बदली करून बडतर्फ करण्याचा डाव रचल्याचा आरोप करत या सर्व प्रकाराची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी आणि तिलगामे यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) व राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ जिल्हा शाखा गडचिराेलीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मंगळवारी गडचिराेली येथे आयाेजित पत्रपरिषदेत या दाेन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिलगामे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. अधिकाऱ्यांच्या सुडबुद्धीमुळे व द्वेषभावनेने तिलगामे यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. पती-पत्नी दाेघेही आजारी झाले असून आर्थिक अडचणीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडला आहे, अशी माहिती नफचे जिल्हाध्यक्ष विजय गाेडघाटे, अशाेक वंजारी, जिल्हा महासचिव जनार्धन ताकसांडे यांनी दिली.
२० हजारासाठी तिलगामे यांना पदावनत करणे, खाेट्या आराेपाखाली त्यांचे तीन टप्प्यानुसार मूळ वेतन कमी करणे, न्यायालयाच्या निर्णयाविराेधात जाऊन बडतर्फ करण्याचे षडयंत्र रचने, आजारी असताना सुद्धा अहेरीला बदली करणे आदी सर्व प्रकार विभाग नियंत्रकांनी केले असल्याचा आराेप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. अन्याय दूर न झाल्यास दाेन्ही संघटनांच्या वतीने ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या विराेधात आंदाेलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी प्रेमलाल वनकर, दीपक मांडवे, वंदना ढवळे, आरती कंगाले, बबीता उसेंडी, चंदू कुळमेथे, भास्कर आत्राम यांच्यासह तिलगामे कुटुंबिय उपस्थित हाेते.