कोयनगुडात विकासकामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:19 PM2018-12-24T22:19:07+5:302018-12-24T22:19:31+5:30
भामरागड येथून तीन किमी अंतरावरील कोयनगुडा गावात लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण रविवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड येथून तीन किमी अंतरावरील कोयनगुडा गावात लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण रविवारी करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील होते. विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्षा संगीता गाडगे, मैत्री मांडियाळी प्रतिष्ठानचे प्रमुख अजय किंगरे, ट्रँक काँल संस्था मुंबईचे प्रमुख आनंद शिंदे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी हॉस्पीटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, समिक्षा आमटे, स्वच्छ प्रतिष्ठानच्या आरती आमटे-नानकर, माजी नगराध्यक्ष राजू वड्डे, आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे कोयनगुडा गावात ५० हजार लीटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी, मोठी विहीर व त्यामध्ये चार बोर, सोलर पंप, सोलर पॅनलला कंपाउंड, प्रत्येक घरी पाईपद्वारे नळ जोडणी, मोठा तलाव, प्रायोगिक तत्त्वावर शौचालय बांधकाम आदी ५० लाख रुपयांचे विकासकामे करण्यात आले. सदर कामांचे लोकार्पण व नव्या कामाचे उद्घाटन लोकबिरादरी प्रकल्पाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावर एका शौचालयाचे बांधकाम केले. गावातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गावालगत मोठा तलाव खोदला. या सर्व कामासाठी ५० लाख रुपये खर्च आला.लोकबिरादरीचे शहरातील मित्र मंडळाने ही आर्थिक मदत केली, असे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यावेळी सांगितले. संचालन विनित पद्मावार तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले.