झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे नव्याने बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:02+5:30
झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांधकामाची होती. यात सिमेंट काँक्रिटचे कॉलम नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम ३० वर्षांपूर्वी झाले होते. परंतु अल्पावधीतच इमारत जीर्ण झाली. त्यामुळे नागरिकांच्या मागण्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु जुन्याच भिंतीवरून स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरूवात झाल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. जुन्याच इमारतीवर नवीन बांधकाम न करता संपूर्ण इमारतीचे नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांधकामाची होती. यात सिमेंट काँक्रिटचे कॉलम नव्हते. त्यावर स्लॅब टाकण्यात आले होते. परंतु आता दुरूस्ती करताना स्लॅब तोडून काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. परिणामी भिंतींना भेगा पडल्या. परंतु याच भिंतींवर स्लॅब टाकण्याचे काम होणार असल्याचे दिसून येते. झिंगानूर येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे येथे नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी केली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथे नव्याने इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी झिंगानूर येथील नागरिकांकडून होत आहे.
शेडमध्ये उपचार
झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्याच इमारतीवर नव्याने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून टिनाचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये रुग्णांच्या नोंदणीसह औषधोपचार केला जात आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे लवकर बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.