धोडराज-हिंदेवाडा मार्गाची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:58+5:302021-06-19T04:24:58+5:30
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते हिंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने ...
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते हिंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुका मुख्यालयाशी जोडण्याकरिता १९९८ मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याची मोठी सोय झाली. परंतु देखभाल व दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले.
माकडांचा हैदोस; पिकांचे नुकसान
सिराेंचा: जंगलात वास्तव्याला राहणाऱ्या माकडांनी मागील चार ते पाच वर्षांपासून लोकवस्तीकडे धाव घेणे सुरू केल्याने ग्रामीण भागातील कौलारू छपरांच्या जुन्या घरांचे आयुष्य कमी झाले आहे. माकडांच्या हैदोसामुळे गावखेड्यातील परसबागा ओस पडत आहेत. मात्र, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन्यजीव प्रगणनेत माकडांचा समावेश असल्याने माकडांना इजा होईल, अशी कृती करणे हा गुन्हा ठरत असतो. काळ्या तोंडाची माकडे ही अत्यंत चपळ वन्यजीव असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
लहान पुलांमुळे रहदारी हाेणार ठप्प
कुरखेडा : कुरखेडा- मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरुपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. काही नागरिक जीव मुठीत घालून पुढचा प्रवास करतात. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते. या नदीवर ठेंगणा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात थोडे अधिक पाणी पडल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होत असते.
सौरदिवे दुरुस्तीकडे हाेत आहे दुर्लक्ष
लाहेरी: वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. लखमापूर बोरी परिसरातील गावांमध्ये सौरदिवे दुर्लक्षित आहेत.
टिल्लू पंप जप्तीची मोहीम सुरू करा
देसाईगंज : नगर परिषदेतर्फे टिल्लू पंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लू पंपाची संख्याही वाढत आहे. पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने टिल्लू पंप पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे. अनेक कुटुंबांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबीयांची अल्प पाणीपुरवठ्यामुळे मोठी अडचण झाली आहे.
हेमाडपंती मंदिरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
चामाेर्शी : तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंती मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालय ऋषीची मूर्ती, शिवपिंड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती शाईल, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, चपराळा भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आहेत.
झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.