गडचिरोली-विसापूर मार्गाची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:30 PM2017-11-12T23:30:05+5:302017-11-12T23:30:46+5:30
गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/रांगी : गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली. तसेच धानोरा तालुक्यातील मोहली नजीक असलेल्या मेटेजांगदा येथील नागरिकांनी मेटेजांगदा-मामा तलावपर्यंतचा दोन किमीचा कच्चा रस्ता श्रमदानातून बांधला.
मेटेजांगदा गावातील नागरिकांना तलावात ये-जा करण्यासाठी रस्त्याअभावी अडचण निर्माण होत होती. या समस्येची दखल घेत येथील विशेष ग्रामसभेत श्रमदानातून रस्ता बांधण्याबाबत ठराव घेण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानातून दोन किमीचा कच्चा रस्ता तयार केला. या रस्त्यावर मुरूम पसरविण्यात आले. यावेळी मंसाराम कोल्हे, सुधाकर कोल्हे, काशिराम हलामी, बाबुराव कुमोटी, आनंदराव बोगा, शांताराम कुमोटी, प्रमोद कोल्हे, बाजीराम कुमोटी यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
गडचिरोली-विसापूर-विसापूर टोलीकडे जाणाºया मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. सदर मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनाची मोठी वर्दळ राहत असल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत होता. सदर मार्गावर आजपर्यंत अनेकदा अपघात घडले. त्यामुळे सदर रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती करण्याचा निर्णय पालिकेचे पाणी परुवठा सभापती तथा विसापूर वार्डाचे नगरसेवक केशव निंबोड यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह विसापूर भागातील नागरिकांना या कामासाठी प्रोत्साहित करू, सिमेंट काँक्रीटने या मार्गावरील खड्डे बुजवून घेण्याचे काम पूर्ण केले. तसेच निंबोड यांच्या उपस्थितीत विवेकानंद परिसरातील मातोश्री वृध्दाश्रमात वृध्द नागरिकांना ब्लँकेट व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, सोनटक्के, सुनिल पोरेड्डीवार, राजू पोटे, जनार्धन साखरे, गोंदरे, डोर्लीकर, तलाठी बांबोळे यांच्यासह विसापूर भागातील नागरिक उपस्थित होते.