गाेगाव सिंचन याेजनेचे पाट दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:52+5:302021-02-05T08:54:52+5:30
गडचिराेली : गाेगाव सिंचन याेजनेच्या पाटाचे काही दूर अंतरावर सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. त्यानंतर काही दूर कच्चा पाट आहे. ...
गडचिराेली : गाेगाव सिंचन याेजनेच्या पाटाचे काही दूर अंतरावर सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. त्यानंतर काही दूर कच्चा पाट आहे. बऱ्याच ठिकाणी हा पाट फुटला आहे. आता ही याेजना बंद आहे. राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाटाची दुरुस्ती करावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांना राेजगार उपलब्ध हाेईल. तसेच सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यास पाण्याचा अपव्यय टाळण्यासही मदत हाेईल.
चामाेर्शी मार्गाची दुरुस्ती रखडली
गडचिराेली : शहरातून चामाेर्शी मार्ग एकतर्फी बनविण्यात आला आहे. मात्र दुसरी बाजू अजूनपर्यंत बनविण्यात आली नाही. त्यामुळे एकाच बाजूने वाहने न्यावी लागत आहेत. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे सभाेवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
काॅम्प्लेक्स परिसरातील रस्ते चकाचक
गडचिराेली : जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयासमाेरून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच आता बाजूला गट्टू लावले जात आहेत. गट्टू सरकू नये, यासाठी बाजूला काँक्रिटचे बीम टाकले जात आहेत. या मार्गावर अनेक कार्यालये असल्याने या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते.
गडचिराेलीत दारूची विक्री जाेरात
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ही दारूबंदी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील काही वाॅर्डांमध्ये मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध हाेते. पाेलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने खुलेआम दारूविक्री केली जात आहे. काही दारूविक्रेत्यांनी तर आपल्या घराला बारचे स्वरूप दिले आहे. या ठिकाणी चकनासुद्धा उपलब्ध हाेतो.
जड वाहनांमुळे नागरिक त्रस्त
गडचिराेली : गडचिराेली शहरातून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ राहते. या वाहनांमुळे अनेक वेळा वाहतुकीची काेंडी हाेते. त्यात क्षमतेपेक्षा अधिक वजन राहत असल्याने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. गडचिराेली शहराच्या सभाेवताल रिंगराेड हाेण्याची गरज आहे.
पाेटेगाव परिसरात भेसळ ताडीची विक्री
गडचिराेली : तालुक्यातील पाेटेगाव परिसरातील अनेक गावांमधील नागरिक ताडीची विक्री करतात. शुद्ध ताडी शरीरासाठी लाभदायक राहते. शहरातील अनेक नागरिक दामदुप्पट किंमत देऊन ताडी खरेदी करण्याची तयारी दर्शवितात. मात्र अनेक ताडीविक्रेते ताडीत रासायनिक पदार्थ टाकतात. ही ताडी आराेग्यासाठी धाेकादायक राहते.
नाटकांमुळे मंडईची रंगत वाढली
गडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासन नाटकांचे आयाेजन करणार नाही, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात हाेता. मात्र काेराेनाचे सावट कमी हाेताच शासनाने नाटक भरविण्यास परवानगी दिली आहे. मंडईसाेबतच आता ग्रामीण भागात नाटके आयाेजित केली जात आहेत. त्यामुळे नाटकांची रंगत वाढली आहे.