गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:31+5:302021-08-15T04:37:31+5:30
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्याची नगर परिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या ...
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्याची नगर परिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी, या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेईस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मुरुमगाव येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मुरुमगाव परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. मुरुमगाव हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी हाेत आहे, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक
गडचिरोली : बालरुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला लागून दुकाने थाटण्यात आली आहेत. बालक पळवून नेण्यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमणामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला आहे.
वनविभागावर वाढला रिक्तपदांचा भार
गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात दाेन हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूडतस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर रात्री व दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
देसाईगंज : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.
आरमोरी तालुक्यात वसतिगृहाची निर्मिती करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.
वीज तारानजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये वीज तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने वीज तारालगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात.
खताच्या ढिगाऱ्यामुळे शहरात दुर्गंधी
गडचिरोली : तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक गावात रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. त्यामुळे प्रशासनाने नाली स्वच्छतेच्या मोहिमेसोबत शेणखताच्या ढिगाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावामध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.
धोडराज मार्गाची दुरुस्ती करा
भामरागड : भामरागडवरून धोडराज अंदाजे पाच किमी अंतरावर आहे. या दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराज येथील नागरिक दर दिवशी भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव, महिलांची गैरसाेय
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.
शहरातील नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील नाल्यामागील अनेक दिवसांपासून उपसण्यात आल्या नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे नाल्या लवकरच तुंबतात. कारवाई करण्याची मागणी आहे. गाेकुलनगर, माता मंदिर परिसरातील काही नाल्या गाळाने भरलेल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा हाेण्यास अडथळा निर्माण हाेणार आहे.