मुलचेरा विश्रामगृहाची डागडुजी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:51+5:302021-06-27T04:23:51+5:30
मुलचेरा : इंग्रजांनी बांधलेल्या व तालुका मुख्यालयी असलेल्या विश्रामगृहाकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सदर विश्रामगृह शेवटच्या घटका मोजत ...
मुलचेरा : इंग्रजांनी बांधलेल्या व तालुका मुख्यालयी असलेल्या विश्रामगृहाकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सदर विश्रामगृह शेवटच्या घटका मोजत आहे. विशेष म्हणजे इंग्रजकालीन वास्तू असल्याने या वास्तूला महत्त्व आहे. त्यामुळे सदर वास्तूचे वारसा म्हणून जतन करणे आवश्यक आहे. ब्रिटिश राजवटीत अनेक अधिकारी या विश्रामगृहाचा वापर करीत होते. मात्र, आता हे विश्रामगृह दुर्लक्षित आहे.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
टोल फ्री क्रमांकांबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकांबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकांवर ते संपर्क साधू शकत नाहीतत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
नळाला तोट्या नसल्यास कारवाई करा
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. तोटी नसल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खोब्रागडी नदीपुलावर कठड्यांचा अभाव
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर १० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी या पुलावर लोखंडी संरक्षक कठडे लावण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच हे संरक्षक कठडे यंत्रणेने काढले. तेव्हापासून या पुलावर संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे.
नाली उपशाचे काम ढेपाळले
चामाेर्शी : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच होऊन नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
बसथांब्याची दुरवस्था वाढली
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य वाढलेे आहे.
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, तिच्याकडे दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
हगणदारीमुक्ती कागदावरच
वैरागड : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याच्या कडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई हाेईना
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे; परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
काेरची : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गंजलेल्या खांबांमुळे धोका
आरमाेरी : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब असून, ते बदलण्याची गरज आहे.
पेट्रोेल पंपाअभावी अवैध विक्री
अहेरी : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोल पंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्राेल पंप नसल्यामुळे नागरिकांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
देसाईगंजात स्वच्छतागृहे बांधा
देसाईगंज : शहरात सार्वजनिक मुतारींची संख्या कमी आहे. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
वीज तारांवरील फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये विजेच्या तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने वीज तारांलगतच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तलावाच्या नहरीला झुडपांचा वेढा
चामाेर्शी : तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, तलावाच्या नहरीची दुरवस्था झाली असून, झुडपे वाढली आहेत. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहरीच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
श्रावणबाळ लाभार्थींना मानधन द्या
अहेरी : जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून, त्यांना तातडीने मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. मात्र, त्यांना नियमित मानधन देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सातत्याने मागणी करूनही दिरंगाईचा प्रश्न सुटला नाही.
मैदानी खेळांबाबत जनजागृती गरजेची
कुरखेडा : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे खेळाडूंचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना कोणी दिसत नाही. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाइलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळांची गरज आहे.