शार्पशूटर्सची दोन पथके पुन्हा आरमोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 01:05 AM2017-06-09T01:05:39+5:302017-06-09T01:05:39+5:30

आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन इसमाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी

Repeat 2 sharpshooters squad | शार्पशूटर्सची दोन पथके पुन्हा आरमोरीत

शार्पशूटर्सची दोन पथके पुन्हा आरमोरीत

Next

सर्चिंग आॅपरेशन सुरू : ‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन इसमाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून शार्पशूटरचे दोन पथक २७ व २८ मे रोजी आरमोरीत दाखल झाले होते. वन विभाग व शापशूटरच्या संयुक्त पथकाने सर्चिंग आॅपरेशन राबवूनही नरभक्षक वाघ गवसला नाही. दोन दिवसांची मुदत संपल्यानंतर शार्प शुटरचे पथक माघारी परतले होते. त्यानंतर पुन्हा वाघाची भीती निर्माण झाल्याने वडसाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या पाठपुराव्यातून शार्प शुटरचे दोन पथक पुन्हा आरमोरीत दाखल झाले आहेत.
आरमोरी व वडसा तालुक्यातील रवी, अरसोडा, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव आदी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर वाढलेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात वाघ दबा धरून बसला असल्याने नागरिकांमध्ये भिती आणखीच वाढली आहे. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने रवी व कोंढाळा परिसरात पिंजरे लावले. याशिवाय वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने ट्रॅपींग कॅमेरेही लावले. तसेच या भागात वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे प्रमाणही वाढविण्यात आले. एवढे सारे करूनही वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाला नाही. वनमंत्री व प्रधान वन सचिवांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील शार्प शुटरचे दोन पथके २७ व २८ मे रोजी आरमोरीला पाठविण्यात आले होते. सर्चिंग आॅपरेशन करूनही वाघ पथकाला गवसला नाही. त्यामुळे मुदत संपल्यानंतर शार्प शुटरची दोन पथके २९ मे रोजी ताडोबाला परतले. त्याच दिवशी २९ मे ला उसेगावजवळील तलावात सायंकाळी या नरभक्षक वाघाने बस्तान मांडले होते. मात्र शार्पशूटर अभावी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाला जेरबंद करू शकले नाही. शार्प शुटर परत गेल्याने वाघ आता जेरबंद होणार की नाही, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. भितीपोटी अनेक नागरिक व शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे.

शनिवारपासून पथक वाघाच्या मागावर
शार्पशूटर्सची दोन पथके ३ जून रोजी शनिवारला आरमोरीत दाखल झाले आहे. वाघाला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथक व वन विभागाच्या संयुक्त चमू मार्फत शोधमोहीम सुरू झाली आहे. युध्दपातळीवर सर्चिंग आॅपरेशन सुरू असून वाघाचे लोकेशन घेण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे तो नरभक्षक वाघ लवकरच जेरबंद होईल, अशी आशा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शार्पशूटर्सच्या दुसऱ्या फेरीत नरभक्षक वाघ जेरबंद होणे आवश्यक आहे. नरभक्षक वाघ जेरबंद होईपर्यंत ताडोबा येथील शार्प शुटरचे पथक परत पाठवू नये, अशी मागणी रवी, कोंढाळा परिसरातील नागरिकांकडून होत आहे. धान रोवणी सुरू होण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

Web Title: Repeat 2 sharpshooters squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.