कर्तव्यात कसूर करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांची बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:27+5:30
करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन करता येत नसून प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यास फक्त नावालाच करपडा येथील जिल्हा परिषद शाळा आहे काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी पंचायत समितीमधील सिर्सी केंद्र अंतर्गत करपडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाची तत्काळ बदली करून नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोजबीच्या सरपंच वैशाली रामदास डोंगरवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन करता येत नसून प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यास फक्त नावालाच करपडा येथील जिल्हा परिषद शाळा आहे काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. वरिष्ठांची कुठल्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता वारंवार सुट्ट्या मारणे, रोज शाळेत एक ते दोन तास उशिरा येणे हे नित्याचे झाल्याने काही पालकांनी ही बाब सरपंचाच्या निदर्शनास आणून दिली. १ जानेवारी रोजी सरपंच वैशाली डोंगरवार यांनी शाळेला भेट दिली असता येथील मुख्याध्यापक मडकाम हे गैरहजर आढळून आले.
याबाबत सहाय्यक शिक्षक चिलांगे यांना विचारणा केली असता, शाळेचे कागदपत्रे ऑनलाइन करण्याकरिता जवळच असलेल्या वैरागड येथे गेल्याचे सांगितले; परंतु शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील ताडाम यांनी मुख्याध्यापकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केले असता धान भरडण्यासाठी गावाकडे गेल्याचे सांगितले. मुख्याध्यापक गैरहजर असताना शिक्षक चिलांगे यांनी सरपंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीसुद्धा या शिक्षकांच्या तक्रारी झाल्या असून अजूनपर्यंत त्यांच्यात सुधारणा झाली नाही.