गणपूर रेती घाटातून अवैध ्न्नरेती उपसा झाल्याचा अहवाल
By admin | Published: February 14, 2016 01:23 AM2016-02-14T01:23:47+5:302016-02-14T01:23:47+5:30
तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटातून पोकलँड मशीनद्वारे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन झाले असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले ...
चौकशी समितीचे निष्कर्ष : कारवाईकडे लागले लक्ष
चामोर्शी : तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटातून पोकलँड मशीनद्वारे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन झाले असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले असून सदर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटावर लिलावाने ठरवून दिलेल्या नियमांचे अटी व शर्तींचे उलंघन करून पोकलँड मशीनद्वारे अवैध उत्खनन करण्यात येत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई करण्यास तयार नव्हते. याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित होताच चामोर्शी तहसीलदार यांनी नायब तहसीलदार एस. टी. खंडारे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, घोटचे मंडळ अधिकारी एस. व्ही. सरपे, भेंडाळाचे तलाठी एन. एस. अतकरे यांचे चौकशी पथक नेमले. या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी गणपूर रेती घाटावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यात लिलावधारकास ताबा दिलेल्या क्षेत्रातून रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. ताबा दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त सोबतचे मोका चौकशी स्थळ नकाशात दर्शविल्याप्रमाणे अनाधिकृत रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे.
लिलावापूर्वी अवैधपणे रेतीचे उत्खनन झाले किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. अनाधिकृत रेतीचे उत्खनन करण्यास संबंधित लिलावधारक जबाबदार असल्याचे दिसते. नकाशानुसार अंदाजे ६ हजार ६८० चौरस मीटर रेतीचे अनाधिकृत उत्खनन झाले आहे. नदी पात्रात रोड तयार करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यालगत मुरूमाचे उत्खनन झाले आहे. त्यामुळे भूमीअभिलेख कार्यालयाने अवैध उत्खनन क्षेत्राची मापणी करून अवैधरित्या रेतीचे उत्खनन झाले. याची शहानिशा करून घ्यावी, असे अहवालात म्हटले आहे. याबाबत तहसीलदार यू. जी. वैद्य यांना विचारले असता, चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. लिलावधारकास बाजू मांडता यावी, यासाठी नोटीस देण्यात आली आहे. योग्य ती कायदेशीर केली जाईल, असे लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)