मारहाण करणाऱ्या ‘त्या’ एपीआयवर गुन्हा नाेंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:32+5:302021-06-02T04:27:32+5:30
गडचिरोली : दुकानात बसलेल्या माझ्या मुलाला अमानुषपणे मारहाण करून हेतूपुरस्सर गुन्हा दाखल करणाऱ्या आरमाेरी येथील सहायक पाेलीस निरीक्षकावर फाैजदारी ...
गडचिरोली : दुकानात बसलेल्या माझ्या मुलाला अमानुषपणे मारहाण करून हेतूपुरस्सर गुन्हा दाखल करणाऱ्या आरमाेरी येथील सहायक पाेलीस निरीक्षकावर फाैजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आरमाेरीच्या सीताबर्डी येथील पुष्पा विनयकुमार जुआरे यांनी जिल्हा पाेलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझी प्रकृती बरी नसल्यामुळे तपासणीसाठी गाेंदिया येथे १८ मे राेजी गेले हाेते. याच दिवशी माझ्या गैरहजेरीत जुना बसस्टॅंडच्या दुकानात माझा मुलगा रूपम जुआरे (२३) हा बसला हाेता. रूपम हा उजव्या हात व पायाने दिव्यांग आहे. याचवेळी चार पाेलीस व एक चालक एका गाडीतून आले आणि पाेलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी गाेदामाची चावी घेऊन बाेलाविले असे सांगितले. तेव्हा मुलाने दुकानाचे मालक हजर नाही, असे सांगितले. थाेड्याच वेळात १५ ते २० पाेलीस, महसूल व नगर परिषदेचे कर्मचारी यांना घेऊन सहायक पाेलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण तिथे आले. त्यांनी रूपमला ओढत नेऊन गाडीत बसविले. दरम्यान प्रतिकार करणाऱ्या रुपमची बहीण नेहा जुआरे हिच्याशीसुद्धा असभ्य वर्तणूक केली व नंतर दाेघांवरही गुन्हा नाेंदविला, असे पुष्पा जुआरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.