लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याची येथे करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:50 PM2024-07-04T15:50:43+5:302024-07-04T15:51:37+5:30
Gadchiroli : पगार लाखात अन् लाच हजारात
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना लाचखोरीने ग्रासले आहे. काही अधिकाऱ्यांचा पगार पाच आकड्यांत आहे; पण चार आकड्यांतील लाच घेणेही त्यांनी सोडले नाही. यामुळे प्रशासकीय कामे करून घेताना सामान्यांची कशी लूट होते, हे समोर आले आहे. लाचखोरीचे हे ग्रहण कधी संपणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
लाचखोरीत महसूल एक नंबर
जिल्ह्यात लाचखोरीमध्ये महसूल सर्वात पुढे आहे. थेट जनतेशी संपर्क येत असलेल्या या विभागातील लाचखोरी रोखण्यात या विभागाच्या प्रमुखांना यश आलेले नाही.
लाचखोरीत कोणत्या विभागाचे किती?
महसूल - २
महावितरण - १
वन - १
सर्वाधिक कारवाया जानेवारीमध्ये
जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्वाधिक दोन कारवाया जानेवारी महिन्यात झाल्या, फेब्रुवारीत एक कारवाई झाली. मार्च, एप्रिलमध्येही कारवाया झाल्या नाहीत. मे महिन्यात लाचखोरीचा एक गुन्हा नोंद असून, जून महिन्यातही कारवाई झाली नाही.
येथे करा तक्रार
लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकाधिक जनजागृती गरजेची आहे. कोणी लाच मागत असल्यास २०६४ या टोल फ्री क्रमांकासह ९९३०९९१७१७०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले आहे.
चार जणांना अटक
लाचखोरीचे सहा महिन्यांत चार गुन्हे नोंद झाले. त्यात चौघांना अटक करण्यात आली. चार प्रकरणांत सर्वात कमी लाचेची रक्कम ५०० रुपये असून, सर्वाधिक रक्कम पाच लाख रुपये इतकी आहे.
गतवर्षीपेक्षा एक कारवाई कमी
जिल्ह्यात गतवर्षी जानेवारी ते जून अखेरपर्यंत पाच कारवाया झाल्या होत्या. यावर्षी चारच कारवाया झाल्या आहेत, यंदा नागपूर परिक्षेत्रात वर्धा जिल्ह्यानंतर सर्वांत कमी कारवाया गडचिरोलीत झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा कारवायांत अव्वलस्थानी असून गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट कारवाया केल्याची नोंद एसीबीकडे आहे.