कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 01:26 AM2016-07-24T01:26:47+5:302016-07-24T01:26:47+5:30

जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता गृहाचे काम पूर्ण केलेल्या एका खासगी कंत्राटदाराने कामाचे देयक काढण्याच्यासंदर्भात संबंधित

Representative of the contractor | कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास जबर मारहाण

कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास जबर मारहाण

googlenewsNext

नासिरखॉपल्ली जि.प. शाळेतील घटना : जखमी मुख्याध्यापक सिरोंचा रूग्णालयात दाखल
सिरोंचा : जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता गृहाचे काम पूर्ण केलेल्या एका खासगी कंत्राटदाराने कामाचे देयक काढण्याच्यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी भांडण करून मुख्याध्यापकाला खूर्चीने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत घडली.
या मारहाणीत जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव रमेश अग्गुवार असे आहे तर मारहाण केलेल्या कंत्राटदाराचे नाव राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर असे आहे. राजन्ना तोटा हा कंत्राटदार असून गेल्या १० वर्षात त्याने सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे अनेक बांधकाम केले. तसेच अंगणवाडी इमारत व शाळा दुरूस्तीची कामे त्याने केली आहेत. तोटा या कंत्राटदाराने सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाचे देयक प्रलंबित आहे. सदर कामाच्या देयकाबाबत जाब विचारण्यासाठी कंत्राटदार राजन्ना तोटा हे नासिरखॉपल्ली शाळेत शनिवारी गेले. तेथील मुख्याध्यापक रमेश अग्गुवार याच्याशी त्याने कामाचे देयक काढण्याच्या बाबीवरून भांडण केले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान कंत्राटदाराचा राग अनावर झाल्याने सदर कंत्राटदाराने चक्क मुख्याध्यापकाला त्याच्या खोलीत बंद करून खूर्चीने त्याला बेदम मारहाण केली. या मुख्याध्यापकाला दुखापत झाली. सध्या मुख्याध्यापक अग्गुवार हे सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. सदर कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शिक्षक संघटनांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

पोलिसांत तक्रार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
कंत्राटदाराच्या मारहाणीत जखमी झालेले नासिरखॉपल्ली जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांनी या घटनेची तक्रार सिरोंचा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून कंत्राटदार रमेश अग्गुवार याचेवर भादंविचे कलम ३२४, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कंत्राटदार अग्गुवार याला अटक केली नव्हती.
घटनेच्या वेळी मुख्याध्यापकांसोबत एक शिक्षक उपस्थित होते. मात्र कंत्राटदाराने मुख्याध्यापकाच्या खोलीचे दार लावल्यानंतर सदर शिक्षक बाहेर राहिले. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

 

Web Title: Representative of the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.