लोकप्रतिनिधी लॉयड्सच्या दलालासारखे वागतात

By admin | Published: May 27, 2017 01:21 AM2017-05-27T01:21:17+5:302017-05-27T01:21:17+5:30

गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने नवीन कामांना मंजुरी देण्याऐवजी काँग्रेसच्या काळात मंजुर झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचेच काम केले आहे.

Representatives like Lloyd's Brigade | लोकप्रतिनिधी लॉयड्सच्या दलालासारखे वागतात

लोकप्रतिनिधी लॉयड्सच्या दलालासारखे वागतात

Next

उसेंडी यांचा आरोप : काँग्रेसच्या कार्यकाळातील कामांचे आता करताहेत लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने नवीन कामांना मंजुरी देण्याऐवजी काँग्रेसच्या काळात मंजुर झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचेच काम केले आहे. शेतकऱ्यांना धोका देऊन हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित जोपासत आहे. लॉयड्स मेटल्ससाठी वनकायदा धाब्यावर बसविण्यात आला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी लॉयड्सचे दलाल असल्यासारखे वागतात, असा आरोप काँग्र्र्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी पत्रपरिषदेत केला.
शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित पत्रपरिषदेत डॉ.उसेंडी यांनी भाजप सरकारचा कार्यकाळ आणि काँग्रेसबद्दल केल्या गेलेला अपप्रचार याचा पंचनामा केला. काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचा गवगवा भाजपने सतत केला. पण गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांना गजाआड का केले नाही? असा सवाल उसेंडी यांनी केला.
गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात सिंचनाचा कोणताही नवीन प्रकल्प मंजूर केला नाही. जे आधी मंजूर झाले त्यांनाही पुरेसा निधी दिला नाही. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी वनकायद्याची अडचण दाखविली जाते. गोंडवाना विद्यापाठीसाठी वनविभागाची जमीन उपलब्ध करून दिली नाही. स्टेडियमसाठीही तीच अडचण दाखविली आहे. पण लॉयड्स मेटल्सला सूरजागडमध्ये उत्खनन करू देण्यासाठी शेकडो वृक्षांची कटाई केली जाते. त्यावेळी मात्र वनकायद्याची अडचण येत नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरीधार्जिणे नसून उद्योगपतींना धार्जिणे आहेत, असा आरोप उसेंडी यांनी केला.
जिल्ह्यात ११ लाख हेक्टर (७८ टक्के) वनजमीन आहे. त्यापैकी अर्धा टक्का जमीन जरी दिली तरी सिंचन प्रकल्प पूर्ण होतील असे उसेंडी म्हणाले. गेल्या तीन वर्षात या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही. त्यांना कोणतीही मदत दिलेली नाही. एवढेच नाही निवडणूक प्रचारात शेतमालाला दीड पट भाव देण्याच्या थापा मारणाऱ्यांनी आधीच्या सरकारने दिलेले शेतमालाचे हमीभावही कमी केले. काँग्र्रेसच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना त्यावेळी विरोध केला पण सत्तेत आल्यानंतर त्याच निर्णयांची अंमलबजावणी केल्याचे उसेंडी म्हणाले.
या पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनभाई गिलाणी, पी.टी.मसरान, नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, समशेरखा पठाण, रजनिकांत मोटघरे, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.

प्रकल्प उभारल्याशिवाय उत्खनन कसे?
ज्या कोसनरीत मुख्यमंत्र्यांनी लॉयड्स मेटल प्रकल्पाची कोनशिला ठेवली त्या ठिकाणी हा प्रकल्प सुरू होणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. मुळात प्रकल्प उभारणी केल्याशिवाय उत्खननाची परवानगी देणेच गैर आहे. असे असताना लॉयड्सकडून उत्खनन कसे सुरू आहे? असा सवाल करीत हे उत्खनन बंद पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावरून उतरून आंदोलन करू, असा इशारा उसेंडी यांनी दिला.

 

Web Title: Representatives like Lloyd's Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.