आंतरक्रिया होणे आवश्यक
By Admin | Published: March 15, 2017 02:03 AM2017-03-15T02:03:48+5:302017-03-15T02:03:48+5:30
विद्यार्थी जे बोलतात ते शिक्षक लिहितात, जे शिक्षक लिहितात ते विद्यार्थी वाचतात. विद्यार्थी परिसरातून अनेक
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा : कार्यशाळेत प्रशांत डावरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली : विद्यार्थी जे बोलतात ते शिक्षक लिहितात, जे शिक्षक लिहितात ते विद्यार्थी वाचतात. विद्यार्थी परिसरातून अनेक अनुभव घेऊन शिकत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी केवळ सुलभकांची भूमिका पार पाडावी. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गोंदिया येथील डायटचे प्राचार्य प्रशांत डावरे यांनी केले.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा डिजिटल व प्रगत करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व विषयसाधन व्यक्तींची एक दिवसीय कार्यशाळा गडचिरोली येथे डायटच्या वतीने घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर होते. यावेळी मंचावर चंद्रपूरचे शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग, डायटचे अधिव्याख्याता विनित मत्ते, डॉ. नरेश वैद्य आदी उपस्थित होते. जे विद्यार्थी वर्गात बोलत नाही अशा अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षकांनी अधिक करावा, याबाबतचा नमुना पाठ घेऊन डॉ. रमतकर यांनी मार्गदर्शन केले.
भाषा व गणित विषयात विद्यार्थी अप्रगत असण्याची कारणे व त्यावरील उपाय याबाबत धनपाल फटिंग यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. मत्ते यांनी जलद शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची गरज याबाबत सांगितले. डॉ. नरेश वैद्य यांनी डिजिटल शाळा व तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात केंद्रप्रमुख हा मुख्य कणा आहे. तर त्यांच्या सोबतीला असलेला विषय साधनव्यक्ती हा शाळा व प्रशासनातील दुवा आहे. दोघांनीही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन प्राचार्य रमतकर यांनी केले. संचालन व आभार डॉ. वैैद्य यांनी मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ९० केंद्रप्रमुख व १०० पेक्षा अधिक साधनव्यक्ती उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)