शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासाठी जागा राखीव ठेवा

By admin | Published: September 8, 2016 01:32 AM2016-09-08T01:32:28+5:302016-09-08T01:32:28+5:30

राज्य शासनाने चंद्रपूर व गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे.

Reservation of district seats in Government Medical College | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासाठी जागा राखीव ठेवा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासाठी जागा राखीव ठेवा

Next

डॉक्टरांची टंचाई दूर होईल : आनंदराव गेडाम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडचिरोली : राज्य शासनाने चंद्रपूर व गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये गडचिरोली या मागास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात याव्या, अशी मागणी काँग्रेसचे माजी आ. आनंदराव गेडाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आनंदराव गेडाम यांनी म्हटले आहे की, गडचिरोली हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या सुविधा अत्यल्प स्वरूपात आहे. जवळजवळ सर्वच नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेवरच अवलंबून राहावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्यामध्ये जिल्ह्यात डॉक्टरांची जवळजवळ १५० वर अधिक पदे रिक्त आहेत. बाहेर जिल्ह्यातून नियुक्ती मिळालेले वैद्यकीय अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात येण्यास इच्छुक नाहीत, अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर ते येथे रूजू होत नाही. शासनाच्या सेवेचा राजीनामा देतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला डॉक्टर मिळत नाही.
तीन वर्ष नक्षलग्रस्त भागात काम केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्याच्या पसंतीच्या जागेवर बदली दिली गेली, तर येथे वैद्यकीय अधिकारी येतील. मात्र अनेकवेळा बदली होऊनही बदलीच्या जागेवर दुसरे डॉक्टर येत नसल्याने येथे बराच काळ काम केल्यानंतरही कार्यमुक्त केले जात नाही. या सर्व प्रकारावर तोडगा निघावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर व गोंदिया या दोन ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता एमबीबीएस अभ्यासक्रमांत ३० टक्के जागा राखीव करण्यात याव्या व त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान त्यांनी १० वर्ष गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी माजी आ. गेडाम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Reservation of district seats in Government Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.