ग्रामीण भागातील जलसाठे पडले कोरडे
By admin | Published: May 23, 2017 12:42 AM2017-05-23T00:42:16+5:302017-05-23T00:42:16+5:30
तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाणी टंचाई तीव्र : पशुंची पाण्यासाठी भटकंती वाढली; तलाव व बोड्या आटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बाहेर पाणी मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांना घरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
आरमोरी तालुक्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक गावात माजी मालगुजारी तलाव व लहान मोठ्या बोड्या आहेत. या बोड्यांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यानंतर मात्र या तलाव व बोड्या वन्यजीव तसेच पाळीव प्राण्यांची तहाण भागविण्यास फार मोठी मदत करतात. पाळीव जनावरे चरायला गेल्यानंतर तलाव व बोड्यांवरच पाणी पिऊन येत असल्याने त्यांना घरी पाणी पाजण्याची गरज भासत नाही. मात्र उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात तलाव व बोड्या आटण्यास सुरूवात झाली आहे. बहुतांश बोड्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांना बाहेर पाणी पिण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. परिणामी गावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावातीलही विहिरी व हातपंप आटल्या आहेत. अशातच पाळीव प्राण्यांचीही तहान भागवावी लागत असल्याने पशु पालकांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तलाव व बोड्या आटल्यामुळे वन्यजीवांसमोरही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव गावात आल्यामुळे त्यांचे शिकारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी जवळपास २० दिवस पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट तीव्र झाले आहे. बंद हातपंप दुरूस्तीकडे यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतींनी विहिरींचा उपसा करणे आवश्यक आहे.