हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 10:50 PM2022-10-19T22:50:18+5:302022-10-19T22:50:43+5:30

मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले.

Resh from silent march in case of murder | हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहरातील बहुचर्चित आंबेडकर वाॅर्डातील आशिष रवी मेश्राम या युवकाची अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीसह इतर आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी शहरात मूक मोर्चा काढून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मृतकाची पत्नी सपना मेश्राम हिच्यासह इतर चार आरोपींना अटक झाल्याने एकूण आरोपींची संख्या ५ वर गेली आहे.  
शहराच्या आंबेडकर वाॅर्डातील आशिष मेश्राम हा ११ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घरून मोटारसायकलने निघून गेल्यानंतर भगतसिंग वाॅर्ड ते तुकुम वाॅर्ड मार्गावरील कालव्यात दि. १२ ला सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी विशाल रामभाऊ रेखडे (वय २४) या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बोलते केले. त्याने या प्रकरणाशी संबंधित शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील निकेश पितांबर अलोणे ऊर्फ नाऱ्या (वय २२), देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील दुर्गेश देवानंद गाधाडे (२२) तसेच आंबेडकर वाॅर्डातील संतोष लेकचंद मेश्राम (२२) या तीन आरोपींना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर या हत्याकांडात मृत आशिषच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. माेर्चात शहराच्या विविध वाॅर्डातील नागरिक सहभागी झाले हाेते. 

जुने संबंध पुन्हा बहरले आणि केली हत्या
-    या प्रकरणातील चार आरोपींना अटक करून बोलते केल्यानंतर हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडले असल्याचे समोर येऊ लागले. दरम्यान मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले. त्यातूनच या हत्याकांडाचा कट शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मनमिळाऊ आणि शांत आशिषमुळे लोक रस्त्यावर
दरम्यान, ही गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या आशिष मेश्राम यांचा अनैतिक संबंधातून पत्नीनेच हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येऊ लागल्याने एरव्ही शांत असलेले देसाईगंज शहर पुरते  हादरले. यामुळे संतप्त शहरवासीयांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आशिषच्या हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शहराच्या मुख्य मार्गांवरून मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. 

 

Web Title: Resh from silent march in case of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.