वनहक्कासाठी सभापती सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:07 AM2018-06-08T01:07:15+5:302018-06-08T01:07:24+5:30
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आहेत.
अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांतील हजारो शेतकरी वनहक्क पट्टे मिळण्यास पात्र आहेत. मात्र काहींनी प्रस्ताव तयार केले नाही तर काही नागरिकांचे प्रस्ताव तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयात पडून आहे. १५ दिवसांपूर्वी उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर तीन पिढ्यांची अट रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही तर श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे, रेशन कार्ड तयार करून देणे आदी कामे करीत आहेत.
यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे कार्यकर्त्यांच्या मार्फत स्वत: गोळा करीत आहेत. गावागावात सभा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. ज्या नागरिकांचे प्रस्ताव अपुऱ्या दाखल्यांमुळे प्रलंबित आहेत. त्याची माहिती मागवून सदर प्रस्ताव जोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात वनहक्क पट्टे वाटपाच्या कामाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.