दारूबंदीसाठी ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:33 AM2018-08-25T01:33:41+5:302018-08-25T01:34:20+5:30
मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
मरारटोला येथे दारू व खर्रा विक्रेत्यांना ५ सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामसभेत घोषित करण्यात आले. याशिवाय कुरखेडा तालुक्यातील दादापूर, वारवी, सोनसरी, येंगलखेडा, पुराडा, हेटीनगर व कासारी या गावांमध्येही दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. सोनसरी येथील ग्रामसभेत सर्वानुमते नियम लावून दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. तसेच दारूबंदी संघटना स्थापन करण्यात आली. दादापूर येथील ग्रामसभा दारूबंदीच्या विषयावर गाजली. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी महिलांच्या निर्णयाला साथ देत दारूबंदीचा ठराव एकमताने पारित केला. केवळ गावच नाही तर, संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारवी येथेही दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. भावी पिढी दारू पासून दूर राहावी या विचारातून हा निर्णय घेण्यात आला. वारवी या गावात १५ घरांमध्ये दारू काढून विकली जाते. त्यावर लवकरच आळा बसावा, अशी ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली. तसेच, कासारी या गावातही दारू विक्री बंदीबाबत निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना बोलावून त्यांच्याकडून ‘दारू विक्री करणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. बैठकीला मालेवाडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेले उपस्थित होते.
येंगलखेडा येथे झालेल्या ग्रामसभेत अटी व नियम लावून दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. तसेच शुक्रवारी दारूबंदीसाठी गाव सभा घेऊन संघटना स्थापन करण्यात आली.