व्यसनमुक्तीचा संकल्प करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:07 AM2017-12-18T00:07:47+5:302017-12-18T00:08:46+5:30
आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनांपासून दूर असली पाहिजे. यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनांपासून दूर असली पाहिजे. यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले.
देसाईगंज येथील सिंधू भवनात शनिवारी व्यसनमुक्तीवर आधारित सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, सर्चचे संचालक डॉ. अभय बंग उपस्थित होते.
स्व. आर. आर. पाटील यांनी ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण केले. त्यांच्या मते कोणताही राजकीय वारसा नसताना व आर्थिक संपन्नता नसताना केवळ प्रामाणिकपणाच्या बळावर राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळविले, असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्चचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले. कोणत्याही व्यसनाची सुरूवात अगदी सहज संगतीने होते. व नंतर हळुहळू त्याचे व्यसनात रूपांतर होते. जिल्ह्यातील तंबाखू सेवनाची समस्या अतिशय भीषण आहे. सर्वेनुसार येथे तंबाखू सेवन करणाºयांचे प्रमाण ५० टक्के आहे. विद्यार्थी, महिला, पुरूष आणि बचत गटातील महिलासुद्धा तंबाखूचे सेवन करीत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन आदिती अत्रे हिने केले. या कार्यक्रमाला देसाईगंज शहरातील बहुसंख्य नागरिक हजर होते.
अहेरीत दिली व्यसनमुक्तीची शपथ
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात येऊन आबांनी जिल्हा विकासासाठी अनेक कामे केली. येथील लोकांच्या तोंडातून ते ऐकायला मिळत आहे. यावरून आबांसाठी जिल्ह्यात किती आपुलकी होती हे दिसून येते. ते जर अजून काही वेळ जगले असते तर जिल्ह्याचा कायापालट झाला असता, असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी रविवारी केले. अहेरी येथे संत मानव दयाल आश्रम शाळेत व्यसनमुक्तीवर आधारित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ. सुमन पाटील, सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग उपस्थित होते. पुढे बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, आबांना व्यसनाची सवय नसती तर आज ते आपल्यासमोर असते. त्यांच्या जाण्याने आपण विकासापासून किती दूर गेलो, हे लक्षात येत आहे. त्यामुळे आजच प्रत्येकांनी निश्चय करावा की, कोणत्याही व्यसनाच्या अधीन न जाता आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगेन आणि स्वत:पासून सुरुवात करून पूर्ण भारत व्यसनमुक्त करण्याचा निर्धार आणि निश्चय करूया, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांना शपथ देण्यात आली.