निराधारांचे अनुदान रखडले

By admin | Published: May 22, 2016 12:54 AM2016-05-22T00:54:16+5:302016-05-22T00:54:16+5:30

निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही.

Resolve grants | निराधारांचे अनुदान रखडले

निराधारांचे अनुदान रखडले

Next

तीन महिने उलटले : शासनाकडून अनुदानच प्राप्त झाले नाही
गडचिरोली : निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहे. अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येते.
निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना चालविल्या जातात. या योजनेंतर्गतच्या लाभार्थ्याला ६०० रूपये मासिक अनुदान दिले जाते. मात्र मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. फेब्रुवारी महिन्यानंतर मानधन मिळणे बंद झाली आहे. मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्व प्रथम बँकेमध्ये जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत. मात्र अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बँकेमध्ये जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सतत तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांच्या कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहेत. तत्काळ मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)

शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले नाही. तिन्ही महिन्याच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा केले जाईल.
- एन. डी. भुरसे, नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), तहसील कार्यालय गडचिरोली

वाढीव अनुदानाबाबत पत्र नाही
निराधार नागरिकांचे अनुदान ६०० रूपयांवरून वाढविण्यात आल्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी केली होती. मात्र अजुनपर्यंत वाढीव अनुदानाबाबतचे पत्र जिल्हास्थळावरील कार्यालयाला प्राप्त झाली नाही. त्यामुळे वाढीव अनुदानाबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पापासून अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे अनुदान नेमके किती वाढले, हे निराधार व अधिकाऱ्यांनाही माहित नाही. किमान जुने अनुदान तरी नियमितपणे देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

योजनानिहाय लाभार्थी
योजनेचे नाव                                         लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार अनुदान योजना                १८,२४८
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना       ५६,२९७
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना       ३३,८०३
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना     २,३७८
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना        ३,०५१
                                     एकूण                 १,११,०७७

Web Title: Resolve grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.