सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:41 AM2021-09-22T04:41:13+5:302021-09-22T04:41:13+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ...

Respond to the Naxal activities that hampered the Surjagad project; | सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या;

सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या;

Next

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून, सुरजागड प्रकल्पाबद्दलचा असलेला विरोध प्रकट केला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातडीने ही बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

सुरजागड लोहखनिज प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यास जशास तसे उत्तर द्या, असे यावेळी ना. शिंदे म्हणाले.

नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्र यांचे काम नीट सुरू आहे अथवा नाही, याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

सुरजागड हा छत्तीसगडी नक्षलींचा मार्ग

पोलिसांनी गस्त घालताना पुरेशी काळजी घ्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली. तसेच सुरजागड आउटपोस्टच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. यावर पोलीस अधीक्षकांनी, या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरजागड हा छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग आहे. तरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

(बॉक्स)

वाघाचा बंदोबस्त तातडीने करा

- जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यासाठी 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया'सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

- जिल्ह्यात नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही तो वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(बॉक्स)

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना

वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या चमूत पशुवैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट आशा तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. त्यांच्या माध्यमातून नरभक्षक वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Respond to the Naxal activities that hampered the Surjagad project;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.