मार्कंडा कंसाेबातील विश्रामगृहाची होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:26+5:302021-04-03T04:33:26+5:30
मार्कंडा कंसाेबा येथील विश्रामगृह बरेच जुने आहे. येथे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे निवासस्थान हाेते. परंतु मागील वर्षी आलेल्या वादळाने छतावरील टिन ...
मार्कंडा कंसाेबा येथील विश्रामगृह बरेच जुने आहे. येथे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे निवासस्थान हाेते. परंतु मागील वर्षी आलेल्या वादळाने छतावरील टिन उडाले. तसेच यापूर्वीच इमारतीची दुरवस्था झाली हाेती. या दुरवस्थेमुळे वनपरिक्षेत्राधिकारी येथे वास्तव्य करीत नव्हते. या समस्येबाबत ‘लाेकमत’ने २२ मार्च राेजी वृत्त प्रकाशित केले हाेते. मुख्य वनसंरक्षकांनी या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाचे अभियंता यांना त्या ठिकाणी पाठवून विश्रामगृहाची पाहणी करण्यास सांगितले. तसेच सदर विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती प्राप्त झाली. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या वनसंपदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे. बऱ्याच वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांना ठेवावे लागते. याकडेसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
बाॅक्स
जीर्ण इमारतींची दुरुस्ती आवश्यक
गडचिराेली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वनविभागाच्या जुन्या इमारती आहेत. सध्या या इमारती दुरवस्थेत आहेत. परंतु, वरिष्ठ अधिकारी इमारतींच्या दुरुस्तीबाबत उदासीन हाेते. नवीन मुख्य वनसंरक्षकांनी वनविभागाच्या दुरवस्थेत असलेल्या अन्य इमारती व विश्रामगृह यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वनविभागाच्या पडलेल्या व पडक्या अवस्थेत असलेल्या इमारतींचे बांधकाम लवकरच होणार, अशी आशा नागरिक व वन्यप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. जीर्ण इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तेव्हाच मुख्यालयी राहून कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडता येईल.