विश्रामगृह बनले जानोसा!
By admin | Published: February 29, 2016 12:51 AM2016-02-29T00:51:42+5:302016-02-29T00:51:42+5:30
शासकीय विश्रामगृह खासगी कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करू नये, ...
शेकडो वऱ्हाड्यांची विश्रामगृहात गर्दी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष
गडचिरोली : शासकीय विश्रामगृह खासगी कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करू नये, असा शासनाचा नियम असला तरी सदर नियम पायदळी तुडवत स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहातून रविवारी दोन वराती निघाल्या. त्यामुळे संपूर्ण विश्रामगृहाला जानोस घराचे स्वरूप प्राप्त झाले होते. विश्रामगृहात थांबणाऱ्यांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला असून सदर विश्रामगृह जानोशासाठी उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गडचिरोली शहरात येणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांना थांबण्यासाठी कॉम्प्लेक्स परिसरात सर्किट हाऊस व इंदिरा गांधी चौकात रेस्ट हाऊस बांधण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी लाखो रूपये खर्चून या विश्रामगृहांची दुरूस्ती करण्यात आली.
इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस शहराच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी थांबणाऱ्या अधिकारी व लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक असते. सदर विश्रामृह सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-१ च्या अखत्यारित येते. या विश्रामगृहात जवळपास १० खोल्या उपलब्ध आहेत. शासनाच्या नियमानुसार सदर विश्रामगृह खासगी समारंभासाठी भाड्याने देता येत नाही. मात्र या विश्रामगृहातून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन वराती निघाल्यानंतर नागरिकही आश्चर्यचकीत झाले. या ठिकाणी थांबलेल्या वऱ्हाड्यांना विचारणा केली असता, एक नवरदेव नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील व दुसरा नवरदेव लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.
विश्रामगृहाच्या परिसरात जमलेले शेकडो वऱ्हाडी, ढोल-ताशांचा गजर व नाचणारा घोडा यामुळे या विश्रामगृहाला मंगल कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. एका वरातीने तर विश्रामगृहाच्या परिसरातच ट्रॅव्हल्स उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य दरवाजातून ट्रॅव्हल्स शिरू न शकल्याने तिला दुसरीकडे नेण्यात आले. ढोल-ताशांचा गजर सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व विश्रामगृहाचे कर्मचारी मात्र याबद्दल काहीच बोलण्यास तयार नव्हते. जानोशासाठी विश्रामगृह उपलब्ध करून देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
१०० रूपयांत मिळतो जानोसा
नवरदेवाचे नातेवाईक मंगल कार्यालयातही थांबू शकतात. मात्र नवरदेवाला नाचवत नेण्याची हौस पूर्ण करण्यासाठी मंगल कार्यालयापासून काही दूर अंतरावर जानोसा उपलब्ध करून दिल्या जातो. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांपासून रेस्ट हाऊस बऱ्यापैकी अंतरावर आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांची विश्रामगृहातच थांबण्याची व्यवस्था केली जाते. लोकप्रतिनिधींचे पत्र जोडल्यानंतर केवळ १०० रूपयात सदर खोली उपलब्ध होत असल्याने विश्रामगृहासाठीच विशेष पसंती दर्शविली जाते. वर्षातून या ठिकाणावरून १० ते १५ वराती निघतात. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.
विश्रामगृहात पसरली घाण]
विश्रामगृहात शेकडो वऱ्हाडी थांबले होते. त्यांनी सोबत आणलेले खाण्याचे साहित्य, पाण्याच्या रिकाम्या बॉटल, दारूच्या निपा, सिगारेटचे पॉकेट व इतर साहित्य, खर्राच्या प्लास्टिकचा खच विश्रामगृहाच्या खोल्या व दरवाजासमोर पडल्या होत्या. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या विश्रामगृहाची दुरवस्था वऱ्हाड्यांमुळे झाली. वऱ्हाडी निघून गेल्यानंतर त्याची साफसफाई करणार कोण, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी दिवसभर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते.
रेस्ट हाऊस स्वस्तात उपलब्ध व्हावे यासाठी आमदार व खासदारांचे पत्र धरून अनेकजण येतात. संबंधित व्यक्तीला एकटे राहण्यासाठी रेस्ट हाऊस उपलब्ध करून दिल्या जाते. मात्र काही नागरिक याचा गैरफायदा घेतात. रविवारी दोन वराती आल्या असल्याचे आपल्या लक्षात आले. मी रेस्ट हाऊसला पोहोचेपर्यंत एक वरात निघून गेली होती. दुसऱ्या वरातीचे वऱ्हाडी थांबले होते. त्यांना तत्काळ विश्रामगृह रिकामे करण्यास सांगितले. विश्रामगृहाची साफसफाई केली जाईल व असे प्रकार यापुढे घडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे सर्वच व्यक्तींना रात्रीचा एक हजार रूपये भाडे करण्याचा विचार सार्वजनिक विभाग करीत आहे.
- संदीप चापले, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग-१