निर्बंध हटविले, मात्र मास्क काढला तर मी पुन्हा येईन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 05:00 AM2022-04-04T05:00:00+5:302022-04-04T05:00:23+5:30
काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गुढीपाडव्यापासून काेराेना प्रतिबंधाचे सर्वच नियम राज्य शासनाने काढले आहेत. मास्क वापरणेसुद्धा ऐच्छिक केले आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. काेराेनाची साथ आटाेक्यात आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हातांना वेळाेवेळी सॅनिटायझर लावणे सक्तीचे केले हाेते. मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असल्याने अनेकजण मास्क वापरत नव्हते. आता तर काेराेनाची साथ आटाेक्यात आली आहे. तसेच सरकारनेही निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. ही बाब नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.
पाच रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात सध्या केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत. मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० पेक्षा कमीच आहे, हे विशेष.
सण, उत्सव धडाक्यात, मात्र मास्क वापरून
गुढीपाडव्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आदी उत्सव येणार आहेत. हे उत्सव साजरे करताना मास्कचा वापर आवश्यक आहे.
९०% नागरिकांना पहिला डाेस
लसीकरणाविषयीची भीती कमी झाल्याने नागरिक आता लस घेत आहेत. जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डाेस, तर ७० टक्के नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे.
कारवाई नाही, मात्र स्वत:च काळजी घ्या
मास्क न वापरल्यास कारवाई करण्याचे अधिकार नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले हाेते. त्यामुळे बाहेर निघताना नागरिक मास्क घालत हाेते. आता मात्र कारवाई हाेणार नाही. मात्र, स्वत:चे आराेग्य जपण्याची जबाबदारी आपली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.