विश्रामगृह दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:31+5:302021-02-15T04:32:31+5:30
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले. परंतु स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृहाची दुरवस्था झाली ...
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले. परंतु स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतागृहांमधून दुर्गंधी
आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिक उघड्यावरच जातात. त्यामुळे परिसरातील दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.
बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
कुरूड : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवांकडून होत आहे.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.
रेगडी येथे बँक शाखा स्थापन करा
घोट : घोटपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, जि. प. उच्च प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे बॅंक शाखा स्थापन करावी.
निवारा शेडचा अभाव
जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावांत पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे.
सावरगाव परिसर दुर्लक्षित
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही.
जीर्ण खांब बदला
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले असून, कधीही कोसळण्याचा धोका आहे. जीर्ण खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र राेष व्यक्त हाेत आहे.
डुकरांचा बंदाेबस्त करा
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्तासाठी काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम सध्या थंडावल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाचे मोकाट डुकरांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. जिल्ह्यात दुग्ध याेजना राबवावी, अशी मागणी होत आहे.
लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
नाली व रस्ते बांधा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाली व रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी हाेत आहे.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचा अपव्यय
देसाईगंज : शहरात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोटी नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विनाकारण वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोट्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.