मिशन इंद्रधनुष्यवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:23 PM2017-08-30T23:23:08+5:302017-08-30T23:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोेली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना राष्टÑीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे सुटलेल्या लाभार्थी बालकांना लस देण्यासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गृहभेटी, सर्वेक्षण व बैठक तसेच मासिक अहवालावर बहिष्कार टाकल्याने सदर मिशन इंद्रधनुष्य मोहिमेवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे सदर मोहीम राबविण्याची जबाबदारी आरोग्यसेवक व सेविकांवर येऊन पडली आहे.
पंतप्रधान सरल योजनेतून विशेष मिशन इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. सदर कार्यक्रम हा आशावर्कर व अंगणवाडी कर्मचाºयांच्या माध्यमातून राबवायचा आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी प्रशिक्षण व सर्वेक्षण कामावर बहिष्कार टाकल्यामुळे हे काम आरोग्यसेवक व सेविकांनाच करावे लागत आहे. परिणामी उपकेंद्र सोडून तसेच इतर आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करून या कामात व्यस्त राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावरील आरोग्यसेवा अस्थिपंजर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अडीच हजारांवर अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या कारभारावर बाराही तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे नियंत्रण असते. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाडी सेवा वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकला आहे. सकाळी अंगणवाडी उघडून पोषण आहार शिजवून तो बालकांना वाटप करण्याचे काम कर्मचारी करीत आहेत.
विशेष मिशन इंद्रधनुष्य सर्वेक्षणाअंतर्गत आरोग्य कर्मचाºयांना प्रत्येक गावात जाऊन दोन वर्षाआतील बालकांचे आतापर्यंतचे आवश्यक असलेले लसीकरण झाले काय, याची चाचणी करायची आहे. शिवाय आरोग्यसेवक व सेविकांना सर्वेक्षणाबाबत विशिष्ट परिपत्रक देण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी असलेल्या घरांचा क्रमांक, एम.सी. कार्ड क्रमांक, लाभार्थ्याचे नाव, महिन्यानुसार विविध प्रकारचे झालेले लसीकरण आदी माहिती संकलीत करून या प्रपत्रात भरावयाची आहे. या कामासाठी सर्व उपकेंद्रातील आरोग्यसेवक व आरोग्यसेविका आता गावातील वॉर्डावॉर्डात फिरत आहेत. आरोग्य कर्मचाºयांमार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २९ आॅगस्ट २०१७ पासून घरोघरी जाऊन हेडकाऊंटिंग सुरू आहे.
या सर्व कामाचा भार आरोग्य कर्मचाºयांवर पडला आहे. त्यामुळे त्यांचे उपकेंद्राअंतर्गत देणाºया येणाºया आरोग्यसेवेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे.
११ सप्टेंबरपासून बेमुदत संप
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीचा निर्णय शासनाने १० सप्टेंबरपर्यंत घ्यावा, सदर निर्णय न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. शिवाय आयटक संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरला गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांनी दिली.
प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मानधनवाढ समिती गठित केली. या समितीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत संघटनेची तिनदा बैठक झाली. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा करून पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ना. मुंडे यांनी दिले होते. मात्र मानधन वाढीसंदर्भात शासनाकडून निर्णय झाला नाही. त्यामुळे आयटक संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाºयांनी आॅगस्ट महिन्यापासून अंगणवाडी बाह्य कामांवर बहिष्कार टाकला आहे.
- देवराव चवळे, जिल्हा संघटक
तथा राज्यसचिव, आयटक