भाजपला चिंतन करायला लावणारा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:26 AM2018-05-27T01:26:16+5:302018-05-27T01:26:16+5:30
विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते. पण तसे झाले नाही आणि भाजपला निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अनपेक्षितपणे काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांनी तब्बल ४९१ मते घेऊन भाजपला आश्चर्याचा धक्का दिला. विधान परिषदेसारख्या घोडेबाजारावर चालणाऱ्या निवडणुकीत असे धक्के बसणे नवीन नाही. पण अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वाढलेले हे मताधिक्य भाजपला चिंतन करायला लावणारे आहे.
राजकारणात कायमसाठी कोणीही कोणाचे नसते असे म्हटले जाते. अर्थात या वाक्याचा अर्थ एखाद्या पक्षाचे ध्येयधोरण पटले नाही तर दुसºया पक्षाच्या तंबूत जाऊन बसणे असा असू शकतो. राजकीय सोयीसाठी अशी पक्षांची अदलाबदली करणे नवीन नाही. पण नितीमत्ता, धोरण वगैरे बासनात गुंडाळून राजकीय पक्षांचे पदाधिकारी जर केवळ आर्थिक लाभासाठी एखाद्या पक्षाला मदत करीत असेल तर ही बाब त्या पक्षासाठी निश्चितच चिंताजनक आहे. विशेषत: भाजपसारख्या नैतिकतेवर, विचारधारेवर आपला पक्ष चालतो असा दावा करणाºया पक्षाचेही हक्काचे मतदार जेव्हा त्यांना धोका देतात, तेव्हा भविष्यातील गडबडीची ती चाहुल आहे असे मानण्यास हरकत नाही.
या निवडणुकीत भाजपचे हक्काचे मतदार ५०७ असले तरी भाजपला ५२८ मते मिळाली. म्हणजे इतर पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी भाजपला मदत केली हे निश्चित. पण भाजपची पूर्णपैकी पूर्ण मते भाजपला मिळाली नाही हेही तितकेच खरे आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे आपल्या हक्काची २७२ आणि राष्टÑवादी काँग्रेसची ९० मते मिळून ३६२ मते होती. पण शिवसेना, बसपा, भारिप यांच्यासह अपक्षांनी मदत केल्यामुळेच काँग्रेसच्या पारड्यात ४९१ मते पडू शकली. घोडेबाजारात मतांची घेवाण-देवाण होत असली तरी सत्ताधारी भाजपच्या उमेदवाला सोडून काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजुने उभे झालेले हे सर्वपक्षीय मतदार भविष्यात भाजपसाठी ‘खतरे की घंटी’ ठरू शकतात. भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेची फळे चाखणाºया शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली. एवढेच काय, ८४ अपक्षांपैकी मोजक्याच लोकांची भाजपला साथ मिळू शकली. या निवडणुकीत काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ हे जरी नवखे उमेदवार असले तरी त्यांच्या मागे उभे असणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मतांचे हे गणित जुळवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावून आपली अजूनही पकड असल्याचे दाखवून दिले.
या निवडणुकीत निसटता का होईल, भाजपला विजय मिळाला हे मात्र खरे आहे. त्यामुळे े‘जो जिता वही सिकंदर’ याप्रमाणे डॉ.आंबटकर सिकंदर ठरले आहे. आता त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करून त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या महत्वाच्या विषयाला त्यांनी हात घालून ते मंजूर करून आणल्यास जिल्ह्याच्या विकासातील तो एक मैलाचा दगड ठरेल. संघनिष्ठ म्हणून त्यांची गडकरी, फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्यांशी जवळीकता आहे. त्याचा फायदा घेत आंबटकर अनेक कामे या जिल्ह्यासाठी खेचून आणतील अशी अपेक्षा ठेवुया.