सेवानिवृत्त शिक्षक चारतात बकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:28+5:302021-09-07T04:44:28+5:30
सिरोंचा : अलिकडे शिक्षकाची नोकरी लागणे म्हणजे भाग्याची बाब समजली जाते. नोकरीनंतर काही दिवसातच शिक्षकाकडे सर्व सुखसोयी लोटांगण घालतात. ...
सिरोंचा : अलिकडे शिक्षकाची नोकरी लागणे म्हणजे भाग्याची बाब समजली जाते. नोकरीनंतर काही दिवसातच शिक्षकाकडे सर्व सुखसोयी लोटांगण घालतात. पण अनेक वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त झालेले एक शिक्षक चक्क बकऱ्या चारण्याचे काम करतात, हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
त्या शिक्षकाचे नाव आहे फसाद हुसेन महेबूब हुसेन. सिरोंचातील धर्मराव विद्यालयातून ३१ जुलै २०१६, म्हणजे आजपासून पाच वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. यानंतर वेळ जाण्यासाठी त्यांनी स्वत: बकरी पालन करण्याचे ठरविले. आधीपासूनच घरात गुरे पालन होत असल्यामुळे प्राण्यांबद्दल त्यांना लळा होता. सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांच्याकडे केवळ २ बकऱ्या होत्या. पण आता त्यांच्याकडे एकूण ३० बकऱ्या, बोकड आहेत.
दुपारी दीड वाजता जेवण केले की, बकऱ्यांना चरायला घेऊन जाण्याठी ते निघतात. नदीच्या काठाने असलेला हिरवा चारा खाऊन बकऱ्या तृप्त झाल्या की, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते घरी परत येतात.
विशेष म्हणजे या भागात वाघ किंवा अन्य श्वापदांचा वावर नाही. त्यामुळे बकऱ्या किंवा माणसांवर कोणीही जंगली प्राणी हल्ला करण्याची भीती नसते.
(बॉक्स)
काम करण्याची लाज बाळगू नये
शुद्ध हवा मिळण्यासह आणि हातपाय मोकळे राहावेत, म्हणून मी हा बकरी पालनाचा आणि त्यांना चरायला नेण्याचा व्यवसाय स्वीकारला. हे काम करताना मला कोणतीही लाज वाटत नाही. यानिमित्ताने पशुसेवाही घडते, असे फसाद हुसेन महेबूब हुसेन सांगतात.