बोनसमधून जीएसटी कपातीची रक्कम मिळणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:33 AM2018-07-20T00:33:54+5:302018-07-20T00:35:03+5:30
येथील तेंदूपत्ता मजुरांच्या बोनसमधून कंत्राटदाराने जीएसटी कराचे २७ लाख रूपये कपात केले होते. याबाबत तेंदूपत्ता मजुरांनी नगर पंचायतीवर गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चकऱ्यांनी मुख्याधिकारी व कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथील तेंदूपत्ता मजुरांच्या बोनसमधून कंत्राटदाराने जीएसटी कराचे २७ लाख रूपये कपात केले होते. याबाबत तेंदूपत्ता मजुरांनी नगर पंचायतीवर गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चकऱ्यांनी मुख्याधिकारी व कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर कंत्राटदाराने मजुरीतून कपात केलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
एटापल्ली नगर पंचायत अंतर्गत एटापल्ली, एटापल्ली टोला, जीवनगट्टा, कृष्णार, वासामुंडी, मरपल्ली या गावांचा समावेश होतो. जीएसटीची रक्कम तेंदूपत्त्यावर आकारली जाते. त्यामुळे तो कर भरण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र कंत्राटदाराने मजुरांच्या बोनसमधून जीएसटीचे २७ लाख रूपये कपात केले. ९ जुलै रोजी मजुरांनी नगर पंचायतीवर मोर्चा काढला.
आठ दिवसांत कपात केलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. आठ दिवसात रक्कम परत न मिळाल्यास पुन्हा नगर पंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल, असे निवेदन मुख्याधिकाºयांना दिले होते. मात्र रक्कम परत केली नाही. त्यामुळे मजुरांनी पुन्हा १९ जुलै रोजी नगर पंचायतीवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, पाणीपुरवठा सभापती रमेश टिकले, बांधकाम सभापती किसन हिचामी, पंचायतीचे माजी सभापती दीपक फुलसंगे, बाबुराव गम्पावार, माजी उपसरपंच अभय पुण्यमूर्तीवार, संभा हिचामी, राजू नरोटे, आविसंचे मनीकंठ गादेवर, रमेश मठ्ठामी, देवाजी येरमा, गुरूदास आत्राम, बारिकराव मडावी, भाऊजी दुर्वा, संदीप हिचामी यांनी केले.
कपात केलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेंदुपत्ता मजुरांनी आंदोलन मागे घेतले.
ठाणेदारांच्या हिसक्यानंतर कंत्राटदार नरमला
एटापल्ली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगतपा यांनी संतप्त मोर्चेकऱ्यांची समजूत काढली. तेंदू कंत्राटदाराला फोन करून मोर्चाबाबतची माहिती दिली. पाच दिवसांत मजुरीची रक्कम परत न केल्यास सहाव्या दिवशी गुन्हा दाखल केल्या जाईल, असा इशारा दिला. ठाणेदारांच्या फोननंतर कंत्राटदाराने पाच दिवसांत कपात केलेली रक्कम देण्याचे आश्वासन दिले.
ं२०१५ मध्ये बोनसची रक्कम नगर पंचायतीने एटापल्ली येथील एसबीआय, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक या तीन बँकांमध्ये जमा केली. परंतु अजून पर्यंत ती रक्कम मजुरांच्या खात्यात जमा न झाल्याने बँकेकडेही मोर्चा वळविण्यात आला. मोर्चकºयांनी मॅनेजरला जाब विचारला असता, धनादेश व मजुरांची रक्कम बुडत नसल्याने वाटपास विलंब झाल्याचे सांगितले.