जमीन परत द्या; अन्यथा उपोषण
By Admin | Published: June 11, 2014 12:03 AM2014-06-11T00:03:36+5:302014-06-11T00:03:36+5:30
वडीलोपार्जित आमच्या मालकीचे २२ एकर शेती गैर आदिवासी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन फेरफार करून शेती बळकाविली. यामुळे आम्ही आदिवासी भोगवटदार भूमिहिन झालो.
पत्रकार परिषद : अन्यायग्रस्त आदिवासींचा प्रशासनास इशारा
गडचिरोली : वडीलोपार्जित आमच्या मालकीचे २२ एकर शेती गैर आदिवासी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन फेरफार करून शेती बळकाविली. यामुळे आम्ही आदिवासी भोगवटदार भूमिहिन झालो. प्रशासनाने आमची नियमबाह्यरित्या बळकाविण्यात आलेली जमीन परत करावी, अशी मागणी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव येथील रामगोपाल देवराव बापू अलाम यांच्यासह आदिवासी शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी माहिती देतांना रामगोपाल अलाम म्हणाले, रतन अलाम गिलगाव, सुमनबाई सुखदेव तोडासे, भादुर्णी, भागरथा अलाम गिलगाव यांच्यासह माझ्या नावाने एकूण सातबाऱ्यावर २२ एकर शेती होती. आदिवासींची जमीन गैर आदिवासींना खरेदी करता येत नाही. मात्र चामोर्शी तालुक्यातील बाधोणा येथील कमल भुरसे, सुमन भुरसे, विमल भुरसे, लिला भुरसे, कविता भुरसे, वासुदेव दुधबळे, नामदेव दुधबळे, जागेश्वर चिळंगे, लहू चिळंगे, फकीरा कोठारे, कवडू चिळंगे तसेच नामदेव पिपरे, सोमा पिपरे, बाबूराव पिपरे, दिवाकर पिपरे, निर्मला पिपरे यांच्या नावाने नियमबाह्यरित्या फेरफार करून शेती चढविण्यात आली.
शासकीय नियमानूसार आदिवासींची जमीन आदिवासींना परत मिळते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही स्वमालकीची शेतजमीनीवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र शेतीचा ताबा मिळाला नाही. यापूर्वी लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणाची सखोल मोका पंचनामा चौकशी करण्यात आली नाही. यामुळे लोकशाही दिनातून आपल्याला न्याय मिळाला नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून ८ जुलै रोजीच्या लोकशाही दिनात याबाबत रितसर तक्रार करून न्याय मागणार आहोत, असेही अलाम यांनी यावेळी सांगितले.
या लोकशाही दिनात आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रामगोपाल अलाम यांनी केला आहे. आमच्या स्वमालकीच्या जमीनीचा गैर आदिवासी भोगवटदारांनी फेरफार करतांना आदिवासी भोगवटदारांची परवानगी घेतली नाही. परस्पर फेरफार करून आमची शेतजमीन बळकाविली, असा आरोपही रामगोपाल अलाम यांनी पत्रकार परिषदेत केला. (स्थानिक प्रतिनिधी)