१ कोटी ११ लाखांचा महसूल
By admin | Published: May 8, 2016 01:19 AM2016-05-08T01:19:49+5:302016-05-08T01:19:49+5:30
स्थानिक उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात वाहन तपासणी, परवाना व नोंदणी इतर कामकाजातून
महिनाभरातील कामगिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाले मालामाल
गडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात वाहन तपासणी, परवाना व नोंदणी इतर कामकाजातून संबंधित वाहनधारकांकडून एकूण १ कोटी ११ लाख ९८ हजार ५६ रूपयांचा महसूल गोळा केला. या उत्पन्नातून उपप्रादेशिक कार्यालय मालामाल झाले असून सदर निधी शासनाकडे वळता करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गडचिरोली तालुक्यापासून कोरची ते सिरोंचा भागातील शेकडो वाहनधारक दररोज आपली वाहने घेऊन नुतनीकरण, परवाना नोंदणी, विमा, खरेदी-विक्री वाहन नोंदणी तसेच वाहनांचे आयुर्मान वाढविणे आदी कामांसाठी येत असतात. या सर्व कामांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संबंधित वाहनधारकांना शासनाच्या नियमानुसार कराचा शुल्क अदा करावे लागते. या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लाखो रूपयांचे उत्पन्न आठवडाभरात मिळत असते. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाला आयएमव्ही शुल्क व सीएफ शुल्काच्या माध्यमातून २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण १६ लाख ५२ हजार ७२० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. बीएमव्ही, एलमएव्ही तसेच ग्रीन टॅक्स व इतर शुल्काच्या माध्यमातून उपप्रादेशिक कार्यालयाला एकूण ९५ लाख ४५ हजार ३३६ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१५-१६ या वर्षात शासनाकडून मिळालेल्या उद्दीष्टापेक्षा १० टक्के अधिक महसूल प्राप्त करून उत्पन्नात आघाडी घेतली आहे. राज्य शासनाचा उपप्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शासनाला महसूल प्राप्त करून देत असतो. उपप्रादेशिक कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. येथील रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वायुवेग पथकाने वसूल केला २० लाखांचा दंड
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वायूवेग पथकाने एप्रिल महिन्यात शेकडो वाहनांची थेट मार्गावर तपासणी करून संबंधित वाहनधारकांकडून तडजोड शुल्क व इतर कर मिळून एकूण २० लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये ८ लाख ७ हजार तडजोड शुल्क व १२ लाख २० हजार रूपयांच्या कराचा समावेश आहे. वायूवेग पथक वर्षभरात कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल करतो.
परवान्याच्या माध्यमातूनही लाखोंचे उत्पन्न
दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवे वाहनधारक शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहनचालक परवान्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात गर्दी करीत आहेत. परवान्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत संबंधित वाहनधारकांवर शुल्क आकारले जाते. या माध्यमातून गडचिरोलीचे उपप्रादेशिक कार्यालयाने एप्रिल महिन्यात हजारो रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.