१० लाखांचा सागवान माल जप्त
By Admin | Published: April 14, 2017 01:11 AM2017-04-14T01:11:47+5:302017-04-14T01:11:47+5:30
१२ एप्रिलच्या मध्यरात्री सागवानाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आसरअल्ली वन परिक्षेत्रातील
१३ बैल, १५ बंड्या सापडल्या: आसरअल्ली वन परिक्षेत्रातील जंगलात कारवाई
सिरोंचा : १२ एप्रिलच्या मध्यरात्री सागवानाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आसरअल्ली वन परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी रात्री २.३० वाजताच्या सुमारास अंकिसा येथील नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साफळा रचला. या घटनेत १० लक्ष रूपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे.
१२ एप्रिलच्या रात्री २.३० वाजताच्या सुमारास आसरअल्ली वन परिक्षेत्रातील वनकर्मचारी अंकिसा येथील नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दबा धरून होते. दरम्यान बैलबंडीत सागवान लठ्ठे भरून येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ३५ ते ४० च्या संख्येत असलेल्या वनतस्करांनी जोरदार दगडफेक केली. त्यावेळी आसरअल्लीचे क्षेत्र सहायक एलएम शेख यांनी त्यांच्या जवळील पिस्तूलमधून स्वसंरक्षणार्थ चार राऊंड हवेत फायर केले. सागवान तस्करांनी दगड फेक हल्ला तीनवेळा करून बैल व बंड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नऊ वनकर्मचारी घटना स्थळावर हजर होते. वनकर्मचाऱ्यांनी सागवान तस्कराचा पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये भास्कर बालाजी मक्काला रा. अंकिसा व संतोष पोचन्ना कोळी रा. लक्ष्मीदेवी पेठा यांचा समावेश आहे. उर्वरित तस्कर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर दुरध्वनीवरून सिरोंचा व आसरअल्ली वन परिक्षेत्र व फिरते पथक सिरोंचा यांना माहिती देण्यात आली. तेथील वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पकडलेले १३ बैल, १५ बैलबंडी व २८ सागवान लठ्ठे यांची पाहणी करून वन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. पकडलेल्या मालाची किमत १० लाख रूपये एवढी असल्याची माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)