महसूल प्रशासन दुर्गम भागात पोहोचले
By Admin | Published: March 16, 2017 01:20 AM2017-03-16T01:20:20+5:302017-03-16T01:20:20+5:30
तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पुरसलगोंदी गावात तालुका मुख्यालयातील महसूल विभागाचे अधिकारी
पुरसलगोंदीत ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम : स्टॉलद्वारे शासकीय योजनांची माहिती
एटापल्ली : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पुरसलगोंदी गावात तालुका मुख्यालयातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी थेट पोहोचून नागरिकांना योजनांची माहिती दिली.
निमित्त होते महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवारी समाधान शिबिर पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार एस. पी. खलाटे, नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, मंडळ अधिकारी बी. एम. गुरू, पुरसलगोंदीच्या सरपंच कल्पना आलाम, शाळेचे मुख्याध्यापक ए. एस. झोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. इटनकर म्हणाले, महिला बचतगटांना नवीन उपक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, या भागातील नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी आदिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आरोग्य, कृषी आदिवासी विकास विभाग तसेच पंचायत समितीमार्फत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून संबंधित विभागाच्या शासकीय योजनांची जनजागृती केली. या शिबिरात योजनांच्या लाभाचे अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी एस. एम. सोमनकर, संचालन ए. एन. शेंडे यांनी केले तर आभार व्ही. आर. टपाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
विविध प्रकारच्या ३७५ दाखल्यांचे वाटप
सदर समाधान शिबिरात महसूल प्रशासनामार्फत ८४ नागरिकांना रहिवासी दाखले, ५९ उत्पन्नाचे दाखले, गृह चौकशी अहवाल ६८, सातबारा ४८, गाव नमूना आठ अ ४८, नातेवाईकांचे प्रमाणपत्र ६८ असे एकूण ३७५ दाखल्यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. तसेच १४ नागरिकांना शिधापत्रिकेची दुय्यम प्रत देण्यात आली. एकूण ४७ जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव शिबिरस्थळी महसूल कर्मचाऱ्यांनीच तयार केले.