रेती घाटांमधून यावर्षी वाढणार महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 10:08 PM2017-09-23T22:08:10+5:302017-09-23T22:08:38+5:30

मोठ्या नद्या आणि त्यातील दर्जेदार रेतीने संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी ई-लिलावासाठी ७३ घाट पात्र ठरविण्यात आले आहेत.

Revenue from sand ghats will increase this year | रेती घाटांमधून यावर्षी वाढणार महसूल

रेती घाटांमधून यावर्षी वाढणार महसूल

Next
ठळक मुद्दे७३ घाट लिलावासाठी पात्र : २२५ कोटींचा महसूल अपेक्षीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोठ्या नद्या आणि त्यातील दर्जेदार रेतीने संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी ई-लिलावासाठी ७३ घाट पात्र ठरविण्यात आले आहेत. या सर्व घाटांमधून कमीत कमी २२५ कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळणे अपेक्षित आहे.
गेल्यावर्षी पाऊस जास्त झाला असतानाही रेतीचा उपसा करण्यासाठी पात्र ठरणाºया घाटांचे प्रमाण कमी होते. यावर्षी आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्केच पाऊस असतानाही रेतीचा उपसा करण्यासाठी जास्त घाट पात्र ठरले आहेत. भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात कोणत्या घाटावरून किती रेतीचा उपसा करता येईल याचा अहवाल तयार करून दिला. त्याला पर्यावरण विभागाच्या समितीने मान्यता दिल्यानंतर त्या घाटांचा लिलाव करण्यासाठी अपर जिल्हाधिकाºयांनी ई-निविदा बोलविल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने आॅनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी, वांगेपल्ली, महागाव बु. या रेती घाटांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, गणपूर रै., तळोधी मो., वाघोली, दोडकुली, मोहुर्ली मो., उसेगाव घाट, पारडी देव, कुरूड, घारगाव, एकोडी आदी रेतीघाटांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील जांभळी, मिचगाव बु. चिचोली, बांधोना आदी घाटांचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ रेती घाट लिलावासाठी पात्र करण्यात आले आहे. यामध्ये कठाणी नदी घाट, साखेरा, पारडी कुपी, राखी, विहीरगाव, शिवणी, खरपुंडी, आंबेशिवणी, आंबेशिवणी राम मंदिर घाट, खुर्सा, मेंढा, बोरमाळा, मुडझा बु., नगरी, पोर्ला, जेप्रा, गोगाव, चांदाळा, बोदली माल आदी रेती घाटांचा समावेश आहे.
देसाईगंज तालुक्यातील ११ रेती घाटांमध्ये कुरूड, कोंढाळा, चोप, विर्शी तुकूम, कोकडी, आमगाव, सावंगी, शंकरपूर, वडसा (जुनी), अरततोंडी, कोकडी आदी रेती घाटांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील नऊ रेती घाट पात्र करण्यात आले आहे. यामध्ये देऊळगाव, देऊळगाव २, किटाळी, वनखी, हिरापूर रिठ, रामपूर चक, अरसोडा, वघाळा, शिवणी आदी रेती घाटांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील कढोली, नान्ही, कुंभीटोला घाट, मौशी, गेवर्धा, कुरखेडा तर मुलचेरा तालुक्यातील गोमणी रेती घाट लिलावासाठी पात्र करण्यात आले आहे.
गतवर्षीही रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेतील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे, दुर्गम भागातील रेती घाटाच्या कंत्राटाकडेही कंत्राटदार पाठ फिरवित असल्याचे गतवर्षी दिसून आले. यावर्षी याही घाटांचा लिलाव होणार आहे.
जुन्या घाटांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
गेल्यावर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून त्याची साठवणूक करीत आहे. काही लिलावात न गेलेल्या घाटांमधूनही रेतीचा उपसा करून रेतीचा अवैध उपसा करून रेती चोरी केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात रेती माफियांवर कारवाया मात्र होताना दिसत नाही.
मुद्दीकुंठा, नगरमचे घाट सर्वात मोठे
सर्वाधिक किमतीचे मोठे घाट सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर आहेत. मद्दीकुंठा येथील घाटाची किंमत जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ७ कोटी ३५ लाख १५ हजार एवढी ठेवण्यात आली आहे. हा घाट ४.९५ हेक्टर क्षेत्रावर असून त्या ठिकाणाहून ५२ हजार ४७३ ब्रास रेतीचा उपसा करता येणार आहेत. नगरम-१ आणि नगरम-२ या घाटांचेही क्षेत्र आणि उपसा करण्यासाठी रेतीसाठा मद्दीकुंठा घाटाएवढाच आहे. मात्र त्यांची अपसेट किंमत अनुक्रमे ४ कोटी ६४ लाख ९१ हजार ५०० आणि ६ कोटी ४६ लाख ९९ हजार ५०० एवढी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Revenue from sand ghats will increase this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.