नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रशासनाचा आढावा
By Admin | Published: May 26, 2016 02:23 AM2016-05-26T02:23:34+5:302016-05-26T02:23:34+5:30
जिल्हाधिकारी पदाची धूरा ए. एस. आर. नायक यांनी स्वीकारल्यानंतर बुधवारी त्यांनी पहिली आढावा बैठक घेतली.
नायक यांचे आवाहन : सकारात्मकता व समन्वयातून काम करा
गडचिरोली : जिल्हाधिकारी पदाची धूरा ए. एस. आर. नायक यांनी स्वीकारल्यानंतर बुधवारी त्यांनी पहिली आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाभरातील सर्व विकास कामांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. सकारात्मकता व समन्वयातून प्रशासन गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. मासिक जिल्हा समन्वय समितीच्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णाबत्तुला, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शैलेंद्र मेश्राम उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी संबंधित विभागांनी एकमेकांशी संपर्क साधून वेळोवेळी पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत. निधी विहित कार्यपध्दतीत खर्च करावा, कामांची तपासणी करून नियोजन समितीकडे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे असे निर्देश दिलेत.
या बाबींचा घेतला आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत बांधकाम विभागांतर्गत चालू असलेले काम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाच्या इमारतीचे बांधकाम, महसूल विभागाच्या इमारतीचे बांधकाम, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे शेतकऱ्यांचे वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेले अर्ज आदी बाबींचा आढावा घेऊन या सर्व बाबी तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.