मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2017 01:14 AM2017-05-07T01:14:55+5:302017-05-07T01:14:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा जाणून घेतला.
पुढील आठवड्यात दौरा : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा जाणून घेतला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरे करून आढावा घेण्यासंदर्भातचे नियोजन केले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आढावा दौऱ्याने सुरूवात झाली. लवकरच ते गडचिरोली जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत. प्रामुख्याने मामा तलाव, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, जलसिंचन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना आदींचा आढावा घेणार आहेत. आदिवासी विभागासंदर्भातील पेसा गावांची घोषणा, अगरबत्ती प्रकल्प, बांबू, मध प्रकल्प यांच्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आर. डी. जावळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.