आयुक्तांनी घेतला विकासकामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:24 PM2018-12-03T22:24:26+5:302018-12-03T22:24:48+5:30
जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मात्र प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांचा तसेच विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मात्र प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांचा तसेच विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला.
आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपायुक्त सुधाकर तेलंग, एन. के. राव, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. संजीवकुमार म्हणाले, सुदृढ बालकांसाठी गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अमृत आहार योजनेच्या माध्यमातून सकस आहार, औषधोपचार देऊन मातेचे आरोग्य उत्तम राहिल, याची दक्षता घ्यावी. कोणतीही गरोदर माता अमृत आहार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश दिले.
सभेच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्याचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्याला पुढे नेण्यासाठी डायलॉग गडचिरोली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव संकल्पनेत युनिसेफच्या तज्ञांकडून मार्गदर्शन झाले आहे. सुदृढ आरोग्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करून सेवा देण्याचे काम सुरू आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, कृषी, सलग्न सेवा, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन, पायाभूत संरचना या घटकावर आधारीत २९ निर्देशांक ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येक निर्देशांकावर विकासाचे काम चालू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत महसूल विभागाशी संबंधित मुद्यांवर चर्चा झाली. बँक प्रणालीमध्ये डाटाएन्ट्रीची प्रगती, महसुली वसुलीची सद्य:स्थिती, कापसावरील बोंडअळी, धानावर मावा-तुडतुडा यामुळे झालेल्या नुकसानीची द्यायची मदत, वनहक्क, पेसा कायद्यांतर्गत केलेल्या कामाची प्रगती, आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.