अपर आयुक्तांनी घेतला क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:40 PM2019-01-21T22:40:04+5:302019-01-21T22:40:23+5:30
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा सोमवारी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा सोमवारी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.
येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर २९ ते ३१ जानेवारीदरम्यान आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती या चार विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा संमेलनात राज्यातील १ हजार ७५७ आदिवासी खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यात होत आहे.
नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर क्रीडा स्पर्धेची तयारी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी अपर आयुक्त मोडक यांनी गडचिरोलीला आज भेट दिली. प्रकल्प कार्यालयात आढावा सभा घेऊन त्यांनी प्रत्यक्ष तयारी जाणून घेतली. सोबतच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोणत्याही उणीवा राहणार नाही, याची खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्शन केले. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना केल्या.
संमेलनासाठी विविध समस्या गठीत केलेल्या आहेत. जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सोमवारपासून नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात आठ प्रकल्पातील ४२१ खेळाडूंचा समावेश आहे. या शिबिराला अपर आयुक्त मोडक यांनी भेट दिली. मैदानाची तसेच निवास व्यवस्थेची पाहणी करून उपस्थित कर्मचाºयांसोबत संवाद साधला. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, कार्यालय अधीक्षक डी.के. टिंगुसले, सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवनकर, आर. के. लाडे, वंदना महल्ले, आदिवासी विकास सहयोगी रामेश्वर निंबोळकर, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक सुधाकर गौरकर, विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर आदी उपस्थित होते.