दुर्गम भागातील शाळांचा समितीकडून आढावा
By Admin | Published: December 26, 2016 01:34 AM2016-12-26T01:34:09+5:302016-12-26T01:34:09+5:30
विद्या परिषदेने नियुक्त केलेल्या ३२ समिती सदस्यांनी भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम
शिक्षकांमध्ये धास्ती : सोयीसुविधा, विद्यार्थी, शिक्षक उपस्थितीबाबत जाणली माहिती
गडचिरोली : विद्या परिषदेने नियुक्त केलेल्या ३२ समिती सदस्यांनी भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन समस्यांचा आढावा जाणून घेतला.
समिती सदस्यांमध्ये राज्याचे उपसंचालक विक्रमसिंह यादव, सहायक संचालक गावकर यांच्यासह इतर ३२ सदस्यांचा समावेश आहे. समिती सदस्यांनी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती, शिक्षक संख्या व उपस्थिती, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वितरणाची स्थिती, शालेय पोषण आहराचा दर्जा, साहित्य व शालेय पोषण आहार बनविताना घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता गृह, शौचालय व्यवस्थापन, गणित पेटी व वापर, शाळाबाह्य विद्यार्थी, शालेय अभिलेख व अद्यावतीकरण किचन शेड, गृहभेटी, विद्यार्थी प्रतिक्रिया, वर्ग निरिक्षण, लोक सहभाग आदींची माहिती जाणून घेतली. समिती सदस्यांनी पालकांसोबतही चर्चा केली. यावेळी बहुतांश पालकांनी शिक्षक नियमितपणे शाळेमध्ये येत नसल्याची गंभीर समस्या समिती सदस्यांसमोर उपस्थित केली. काही शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. येथील दोनपैकी एकच शिक्षक येतात. पावसाळ्यात तर दोन्ही शिक्षक गैरहजर राहत असल्याची गंभीर बाब समिती सदस्यांसमोर उपस्थित केली आहे. संबंधित शिक्षकांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
पहिल्यांदाच अशा प्रकारची तपासणी विद्या परिषदेच्या मार्फतीने करण्यात आली असल्याने शिक्षकांमध्येही आपल्यावर कोणती कारवाई होईल. अशी भिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)