पोलीस महासंचालकांनी घेतला कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:35 PM2019-01-14T22:35:38+5:302019-01-14T22:36:17+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर सोमवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी सोमवारी पोलीस विभागाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच किटाळी येथील पोलीस फायरिंग रेंजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर सोमवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी सोमवारी पोलीस विभागाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच किटाळी येथील पोलीस फायरिंग रेंजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
महासंचालकांच्या या मुक्कामी दौऱ्यामुळे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे हेसुद्धा गडचिरोलीत तळ ठोकून आहेत. या अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व इतर अधिकाऱ्यांशी महासंचालकांनी सायंकाळी एकत्रितपणे चर्चा केली. जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा या चर्चेत घेण्यात आला. तसेच पोलिसांना या कामात चांगले यश मिळत असल्याबद्दल महासंचालकांनी अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
मंगळवारी जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी महासंचालक भेट देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुरजागड पहाडावर नवीन पोलीस ठाण्यासाठी नुकतीच जागेला मंजुरी मिळाली. त्या ठिकाणी नेमणूक करावयाच्या मनुष्यबळासंदर्भातील निर्णयही त्यांच्या या भेटीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.