धान पिकाचे क्षेत्र १३ टक्क्यांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:22 AM2018-09-02T00:22:16+5:302018-09-02T00:23:26+5:30
सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १३ टक्क्यांनी धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावरून धान पिकाबाबत टीका होत असली तरी शेतकरी या पिकाला विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
२०१८ च्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुध्दा तेवढेच आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ७१ हजार ३९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत अधिक प्रमाणात धानाची लागवड झाली असल्याचे दिसून येते. १५ दिवसानंतर अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामध्ये धानाचे क्षेत्र आणखी वाढले असण्याची शक्यता कृषी अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.
धानाच्या पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाही. खर्चाच्या तुलनेत धान पिकाला कमी भाव मिळतो, अशी टीका केली जाते. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी धान पिकाला वगळून इतर पिकांची लागवड करतात. सर्वसाधारण शेतकरी मात्र धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी खर्च निघेल, याची शाश्वती असल्याने येथील शेतकरी धान पिकाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी हलक्या धान पिकाची लागवड करतात. हलके धान पीक आता गर्भात आहे. त्यामुळे यानंतर एक जरी पाऊस पडला तरी धानाचे उत्पादन होते. इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या लागवडीचा खर्च कमी आहे व हमखास उत्पादन होत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही धान पिकाच्या लागवडीला पसंती दर्शवितात. परिणामी धान पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे.
१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सोयाबिनच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. सुमारे १० हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जात होती. मात्र मागील वर्षांपासून सोयाबिन पिकास दगा देण्यास सुरूवात केल्याने सदर शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मका व इतर पिकांची लागवड केली. धान उत्पादक शेतकरी मात्र धानाच्या लागवडीवर ठाम आहे. तसेच नवीन शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी धानाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. त्यामुळे धानाच्या लागवडीचे कौशल्य व माहिती येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे इतर पिकांची लागवड करून धोका पत्करण्यापेक्षा धानाची लागवड केली जाते. त्यामुळे धानाच्या क्षेत्रात दरवर्षीने भर पडत आहे.
३१ हेक्टरवर आवत्या
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना आवत्या टाकण्यास चांगली सवलत दिली. त्यामुळे दवर्षीच्या तुलनेत आवत्याचे क्षेत्र वाढले आहे. एटापल्ली, धानोरा, कोरची या तालुक्यांमधील शेतकरी आवत्या टाकण्यास अधिक प्राधान्य देतात.
पावसामुळे सोयाबीन व कापसाची स्थिती चिंताजनक
यावर्षी सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. सोयाबीन व कापूस या पिकांना अत्यंत कमी प्रमाणात पाणी आवश्यक आहे. जमिनीत काही प्रमाणात ओलावा असला तरी चालते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेत जमिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी सोयाबिन व कापूस या दोन्ही पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचा खर्च केल्यानंतरही त्यांचा उत्पादन खर्च भरून निघणार की नाही, अशी पिकांची स्थिती आहे. त्यामुळे सदर शेतकरी चिंताग्रस्त आहे. उलटपक्षी धान पिकाला थंड व मुबलक प्रमाणात पावसाची गरज आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे पीक डोलत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणीची कामे अगदी वेळेत आटोपली. त्यामुळे धानाच्या उत्पादनात यावर्षी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.