धानपिकावर पुन्हा वाढला रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:27 PM2020-09-23T18:27:33+5:302020-09-23T18:32:19+5:30
आता वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा धानपिकावर कीड व विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीनदा फवारणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एक ते दीड महिन्याआधी धानपिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. दरम्यान शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केल्याने रोगाची तीव्रता कमी झाली. मात्र आता वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा धानपिकावर कीड व विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीनदा फवारणी केली आहे.
तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात मुख्यत्वे धानपिकाची लागवड करतात. सद्य:स्थितीत धानपीक गर्भावस्थेत आहे. अशा स्थितीत पिकाला रोगाने ग्रासले असून पीक रोगमुक्त करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहेत.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी जास्त मुदतीच्या जड प्रतीच्या धानपिकाची लागवड करतात. दिवसेंदिवस पीक लागवडीचा खर्च वाढत चालला आहे. वातावरणातील बदलामुळे पिकावंर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कीटकनाशक फवारणीपोटी शेतीच्या खर्चात वाढ होत आहे. धानपिकाला पूर्वी केवळ खताची मात्रा दिली जात होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत तीन ते चारदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. परिणामी खतापेक्षा कीटकनाशकाचाच खर्च अधिक असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. आत्मा व कृषी विभागाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून धान, कापूस व सोयाबीन पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या कीटकनाशकाची किती प्रमाणात व कशा पद्धतीने फवारणी करावी, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवड व रोग, कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात गावासभोवतालचे शेतशिवार धानपिकाने हिरवेगार दिसून येत आहे. मात्र पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सकाळच्या सुमारास अनेक शेतकरी व मजूर पाठीवर पम्प घेऊन फवारणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोरोना लॉकडाऊनमुळे खालावली आहे. कीटकनाशक फवारणीचा खर्च शेतकऱ्यांना झेपत नसल्याने शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर कीटकनाशक व औषधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
कपाशीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
चामोर्शी तालुक्यात खरीप हंगामात धानपिकासोबतच अनेक शेतकरी कापूस तसेच भाजीपाला पिकाची लागवड करतात. यावर्षी चामोर्शी तालुक्यात पर्जन्यमान बऱ्यापैकी झाल्याने कापूस पीक जोमात आले. फळधारणा अवस्था सुरू असताना कपाशी पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला. आता कापूस पीक रोगमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून फवारणी केली जात आहे.